देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या क्रिकेटपटूंना बीसीसीआय सचिव जय शाह यांनी खुशखबर दिली आहे. पुरेसे मानधन मिळत नसल्याने अनेकजण देशांतर्गत क्रिकेट खेळणे टाळतात. पण, आता यावर तोडगा किंबहुना या क्रिकेटला प्राधान्य म्हणून बीसीसीआयने नवीन योजना आखल्याचे दिसते. जय शाह यांच्या घोषणेनुसार, देशांतर्गत क्रिकेटमधील पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंना सामनावीर आणि मालिकावीरच्या माध्यमातून पैसे दिले जातील. याशिवाय ज्युनियर स्तरावरील स्पर्धांमध्येही क्रिकेटपटूंना सामनावीर आणि स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून सन्मानित केले जाईल आणि त्यांना बक्षीस रक्कम दिली जाईल.
जय शाह यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ही मोठी घोषणा केली. आम्ही देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंना सामनावीर आणि मालिकावीरच्या माध्यमातून बक्षीस रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय वरिष्ठ खेळाडूंना विजय हजारे ट्रॉफी आणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी या स्पर्धेत खेळणाऱ्यांना सामनावीरच्या माध्यमातून बक्षीस रक्कम दिली जाईल, असे जय शाह यांनी पोस्टमध्ये म्हटले.
जय शाह यांनी आणखी लिहिले की, आम्ही सामनावीर आणि मालिकावीर यांना बक्षीस रक्कम देऊन देशांतर्गत क्रिकेटचे महत्त्व वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत. यासाठी खूप सहकार्य करणाऱ्या अपेक्स काउन्सिलचे आभार. आपण सर्वजण मिळून आपल्या क्रिकेटपटूंसाठी पोषक वातावरण निर्माण करू. जय हिंद. खरे तर जय शाह २०१९ मध्ये पहिल्यांदा बीसीसीआयचे सचिव बनले. त्यानंतर २०२२ मध्ये दुसऱ्यांदा त्यांच्याकडे ही जबाबदारी आली. २०२५ मध्ये त्यांच्या या पदाचा कार्यकाळ संपुष्टात येईल.