आशिया चषकाच्या यजमानपदावरून भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डामध्ये मागील काही कालावधीपासून वाद सुरू आहे. बीसीसीआयने पाकिस्तानच्या हायब्रीड मॉडेलला विरोध केला आहे. आशिया चषक एखाद्या तटस्थ ठिकाणी व्हावा असे बीसीसीआयचे म्हणणे आहे. पण पाकिस्तानच्या आक्रमक पवित्र्यामुळे ही स्पर्धा होणार की नाही याबाबत संभ्रमाचे वातावरण आहे. अशातच आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आणि बीसीसीआय सचिव जय शाह यांनी एक मोठे विधान केले आहे.
बीसीसीआयने आयपीएल २०२३ चा अंतिम सामना पाहण्यासाठी बांगलादेश, अफगाणिस्तान आणि श्रीलंका क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्यांना आमंत्रित केले आहे. यादरम्यान आशिया चषकाच्या मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, आयपीएलच्या फायनल सामन्यानंतर जय शाह आणि भारतात येणाऱ्या दुसऱ्या देशातील क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्यांमध्ये बैठक होणार आहे.
जय शाहंचं मोठं विधान
तसेच २८ मे रोजी होणाऱ्या फायनल सामन्यानंतर आशिया चषकाचे भवितव्य ठरवले जाईल असे जय शाह यांनी म्हटले आहे. "आम्ही श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करू आणि अंतिम निर्णय घेऊ. त्यामुळे आयपीएल २०२३ च्या फायनलनंतर आशिया कपचे भवितव्य ठरेल", असे जय शाह यांनी सांगितले.
"मुंबई इंडियन्स फायनलमध्ये येऊ नये असं वाटतं, कारण...", ड्वेन ब्राव्होला सतावतेय भीती
दरम्यान, नियोजित वेळापत्रकानुसार आशिया चषक २०२३ ची स्पर्धा पाकिस्तानात होणार आहे. मात्र, सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघ पाकिस्तानात जाणार नसल्याचे बीसीसीआयने सांगितले आहे. तसेच ही स्पर्धा तटस्थ ठिकाणी व्हावी या मागणीवर बीसीसीआय ठाम आहे. तर, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने हायब्रीड मॉडेलचा पर्याय दिला आहे. परंतु या मॉडेलला देखील बीसीसीआयने विरोध दर्शवला आहे.
"पडलो पण हरलो नाही...", मुंबईविरूद्धच्या पराभवानंतर गौतम गंभीरने चाहत्यांचे मानले आभार