भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव जय शाह यांनी बुधवारी एक मोठी घोषणा केली. आगामी ट्वेंटी-२० विश्वचषकात भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडेच असेल असे त्यांनी जाहीर केले. त्यामुळे रोहित आगामी विश्वचषक खेळणार हे स्पष्ट झाले आहे. यावेळी जय शाह यांनी रणजी ट्रॉफीत न खेळणाऱ्यांना कडक शब्दांत इशारा दिला आहे. भारतीय क्रिकेट संघातील करारबद्ध खेळाडूंना देशांतर्गत स्पर्धेत खेळणे बंधनकारक असते, असे शाह यांनी सांगितले. एखादा खेळाडू देशांतर्गत क्रिकेट खेळण्यास नकार देत असेल तर त्याची नाटकं खपवून घेतली जाणार नाहीत, असा इशारा त्यांनी दिला.
जय शाह म्हणाले की, जे रणजी क्रिकेट खेळत नाहीत त्यांना आधीच फोनवरून कळवण्यात आले आहे. मी पत्र देखील लिहीन की, जर तुमचा मुख्य निवडकर्ता, तुमचा प्रशिक्षक आणि तुमचा कर्णधार असे म्हणत असेल तर तुम्हाला लाल चेंडूचे क्रिकेट खेळावे लागेल. कोणतेही कारण चालणार नाही. ही सूचना सर्व युवा आणि तंदुरूस्त खेळाडूंना लागू होते.
तंदुरूस्त असल्यास खेळावेच लागेल - शाह तसेच रणजी स्पर्धेसारख्या देशांतर्गत स्पर्धांमध्ये खेळाडूंचा सहभाग राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या मार्गदर्शनानुसार असतो. जर एखादा खेळाडू दुखापतीचा सामना करत असेल, तो क्रिकेटपासून दूर असेल तर आम्ही त्याच्यावर काहीही लादू इच्छित नाही. पण तो तंदुरूस्त असेल आणि युवा खेळाडूंच्या श्रेणीतील असेल तर त्याचे कोणतेही कारण खपवून घेणार नाही. हा मेसेज सर्व करारबद्ध खेळाडूंसाठी आहे, असेही जय शाह यांनी म्हटले.
खरं तर यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनवरून हा वाद सुरू झाला आहे. किशन हार्दिक पांड्यासोबत सराव करत आहे पण झारखंडच्या रणजी संघातून खेळण्यास तो तयार नाही. त्यामुळे बीसीसीआय सचिव जय शाह यांनी स्पष्ट केले की, प्रत्येक खेळाडूला रणजी ट्रॉफीत खेळावे लागेल. अन्यथा निवड समितीच्या अध्यक्षांनी मला तशी सूचना दिली आहे आणि मी त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे निर्णय घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य देणार असल्याचेही शाहंनी नमूद केले.