टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याचा उत्तराधिकारी शोधण्यासाठी BCCI ने कंबर कसली आहे. माजी फलंदाज गौतम गंभीरसह ऑस्ट्रेलियाचे माजी खेळाडू रिकी पाँटिंग, जस्टीन लँगर यांचे नाव टीम इंडियाच्या नव्या प्रशिक्षकाच्या शर्यतीत आहे. आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचे प्रशिक्षकपद भूषविणाऱ्या पाँटिंगने काही दिवसांपूर्वी त्याला भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी विचारणा केल्याची माहिती दिली होती, असेच काहीचे लखनौ सुपर जायंट्सचा कोच लँगरही म्हणाला होता. पण, जय शाह ( Jay Shah) यांच्या विधानाने ऑस्ट्रेलियाचे माजी खेळाडू खोटारडे ठरले आहेत.
बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी शुक्रवारी भारताचे पुढील मुख्य प्रशिक्षक होण्यासाठी कोणत्याही माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूशी बोर्डाने संपर्क साधला नसल्याचा दावा केला आहे. राहुल द्रविडचा उत्तराधिकारी भारतीय असू शकतो, असे सांगून त्यांनी संकेत दिले की त्यांना देशातील खेळाच्या संरचनेची "सखोल माहिती" असली पाहिजे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतरही द्रविडला कार्यकाळ वाढवून देण्याची ऑफर बीसीसीआयने दिली होती, परंतु त्याने नकार दिला. रिकी पाँटिंग आणि जस्टीन लँगर या माजी ऑस्ट्रेलियन खेळाडूंनीही या पदासाठी नकार दिला आहे .
"मी किंवा बीसीसीआयने मुख्य प्रशिक्षकपदाच्या ऑफरसाठी कोणत्याही माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटरशी संपर्क साधला नाही. मीडियामध्ये येणारे वृत्त हे पूर्णपणे चुकीचे आहेत," असे शाह यांनी एका निवेदनात म्हटले आहे. पाँटिंग आणि लँगर दोघेही आयपीएलमध्ये अनुक्रमे दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्सचे मुख्य प्रशिक्षक आहेत. सध्या कोलकाता नाईट रायडर्सला मार्गदर्शन करत असलेल्या गौतम गंभीरसह चेन्नई सुपर किंग्जचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांचेही नाव चर्चेत आहे. "आमच्या राष्ट्रीय संघासाठी योग्य प्रशिक्षक शोधणे ही सखोल प्रक्रिया आहे. भारतीय क्रिकेट संरचनेची सखोल माहिती असलेल्या व्यक्तींना ओळखण्यावर लक्ष केंद्रित करत आहोत," असेही त्यांनी सांगितले.
बीसीसीआय सचिवांनी असेही सांगितले की भारतीय देशांतर्गत क्रिकेटचे सखोल ज्ञान असणे हा पुढील प्रशिक्षक नियुक्त करण्यासाठी एक महत्त्वाचा निकष असेल. ते म्हणाले की "टीम इंडियाला खऱ्या अर्थाने पुढील स्तरावर नेण्यासाठी समजून घेणे महत्त्वपूर्ण ठरेल."
पाँटिंगने गुरुवारी सांगितले होते की या भूमिकेसाठी संपर्क साधण्यात आला होता, परंतु ही जबाबदारी सध्या त्याच्या "लाइफस्टाइल"मध्ये बसत नसल्याने त्याने नकार दिला.