भारतीय संघ विराट कोहलीच्या अनुपस्थितीत मायदेशात इंग्लंडविरूद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. सध्या या मालिकेतील तिसरा सामना राजकोट येथील सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. विराट कोहलीने वैयक्तिक कारणास्तव या मालिकेतून माघार घेतली आहे. मात्र, किंग कोहलीबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. अशातच बीसीसीआय सचिव जय शाह यांनी विराटचा निर्णय वैयक्तिक असल्याचे सांगत उलट सुलट चर्चा थांबवण्याचे आवाहन केले.
१५ वर्षांच्या कालावधीत एखादा व्यक्ती पहिल्यांदाच वैयक्तिक कारणास्तव सुट्टीवर गेला असेल तर यात चुकीचे काय आहे. विराटचा हा योग्य निर्णय आहे. कोणत्याही कारणाशिवाय सुट्टी मागणाऱ्यांपैकी विराट नाही. आपण त्याच्यावर विश्वास ठेवायला हवा, १५ वर्षांनंतर कोणी वैयक्तिक कारणास्तव रजा मागत असेल तर तो त्याचा अधिकार आहे. विराट असा खेळाडू नाही की तो विनाकारण रजा मागेल, असे जय शाह यांनी सांगितले. ते 'ESPNcricinfo' शी बोलत होते. अफगाणिस्तानविरूद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेनंतर विराट क्रिकेटपासून दूर आहे. इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या दोन सामन्यांसाठी भारतीय संघ जाहीर झाला त्यात विराटचे नाव होते. पण अचानक त्याने आपले नाव मागे घेतले.
विराटने रजा मागितली तो त्याचा अधिकार - शाह विराट कोहली उर्वरीत दोन कसोटी सामन्यांना देखील मुकणार आहे. विराट कोहली आगामी ट्वेंटी-२० विश्वचषकात खेळणार का? या प्रश्नावर जय शाह यांनी सांगितले की, आपण याबद्दल नंतर बोलूया आता योग्य वेळ नाही. खरं तर भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडेच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रोहितकडे क्षमता आहे, आम्हाला माहित आहे. त्याने वन डे विश्वचषकात संघाला सलग १० सामने जिंकून अंतिम फेरीत पोहोचवले. भारत बार्बाडोसमध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आगामी ट्वेंटी-२० विश्वचषक जिंकेल, असा विश्वास बीसीसीआयच्या सचिवांनी व्यक्त केला. दरम्यान, भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना १५ फेब्रुवारीपासून राजकोटमध्ये खेळवला जात आहे.