वन डे विश्वचषकासाठी बरोबर एक महिन्याचा कालावधी उरला आहे. ५ ऑक्टोबरपासून भारतात या बहुचर्चित स्पर्धेचा थरार रंगणार आहे. सलामीचा सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. भारतात तब्बल १२ वर्षांनंतर आयसीसी वन डे विश्वचषकाचे आयोजन होत आहे. आगामी स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर झाला असून अक्षर पटेलचे पुनरागमन झाले आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन संघ जाहीर केला. दुसरीकडे, बीसीसीआयच्या वतीने बोर्डाचे सचिव जय शाह यांनी बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना स्पर्धेसाठी गोल्डन तिकीटाच्या रूपात एक खास भेट दिली.
बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी आज बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची भेट घेतली आणि त्यांना २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेचे गोल्डन तिकीट दिले. खरं तर हे असे तिकीट आहे, ज्याद्वारे बिग बी भारतातील कोणत्याही स्टेडियममध्ये सामना पाहू शकतील आणि त्यांना प्रमुख पाहुण्यांमध्ये स्थान मिळेल. बीसीसीआयने जय शाह आणि अमिताभ बच्चन यांचा फोटो शेअर केला आहे.
बीसीसीआयने फोटो शेअर करताना म्हटले, "आमच्या गोल्डन आयकॉन्ससाठी गोल्डन तिकिट. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांना आज सुपरस्टार श्री अमिताभ बच्चन यांना गोल्डन तिकिट देण्याचा बहुमान मिळाला. एक दिग्गज अभिनेता आणि क्रिकेटचे कट्टर चाहते. श्री. अमिताभ बच्चन यांचा टीम इंडियाला असलेला सततचा पाठिंबा आम्हा सर्वांना प्रेरणा देतो. २०२३ च्या विश्वचषकासाठी त्यांना आमच्यासोबत सामील करून घेताना आम्ही उत्सुक आहोत."
विश्वचषकासाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन, लोकेश राहुल, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव.