Join us  

हार्दिकची एन्ट्री कधी? द्रविडचं भवितव्य काय? BCCI सचिव जय शहांनी दिली मोठी अपडेट

सध्या भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2023 9:03 PM

Open in App

वन डे विश्वचषकात दुखापत झाल्यानंतर हार्दिक पांड्या मागील काही दिवस आयपीएलमुळे चर्चेत आहे.  मुंबई इंडियन्सच्या संघात पांड्याची घरवापसी झाली आहे. दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर असलेला हार्दिक राष्ट्रीय संघात पुनरागमन कधी करणार याबाबत बीसीसीआय सचिव जय शाह यांनी मोठी अपडेट दिली आहे. शनिवारी मुंबईत झालेल्या महिला प्रीमिअर लीगच्या (WPL 2024) दुसऱ्या सत्राच्या लिलावात पोहोचलेल्या शाह यांनी मीडियाला सांगितले की, हार्दिक जानेवारीमध्ये अफगाणिस्तानविरूद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी फिट होऊ शकतो.

यादरम्यान शाह यांनी प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या भवितव्याबद्दलही भाष्य केले. द्रविड यांचा टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून दोन वर्षांचा कार्यकाळ वन डे विश्वचषकासोबत संपला, पण बोर्डाने दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी त्यांच्या आणि त्यांच्या संपूर्ण सपोर्ट स्टाफचा करार वाढवला आहे. त्यानंतर २०२४ मध्ये होणाऱ्या ट्वेंटी-२० विश्वचषकापर्यंत द्रविड भारतीय संघाचे प्रशिक्षक राहण्याची दाट शक्यता आहे. प्रशिक्षक द्रविड यांच्या करारावर शाह म्हणाले, "भारताचा मुख्य प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविड यांच्या कार्यकाळाचा कालावधी टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेतून परतल्यानंतर निश्चित केला जाईल."

ट्वेंटी-२० मालिकेसाठी भारतीय संघ -सूर्यकुमार यादव (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, तिलक वर्मा, रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, इशान किशन, जितेश शर्मा, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, दीपक चहर.

ट्वेंटी-२० मालिकेचे वेळापत्रक

  1. १० डिसेंबर - डर्बन, सायंकाळी ७.३० वाजल्यापासून
  2. १२ डिसेंबर - जीकबेर्हा, रात्री ८.३० वाजल्यापासून
  3. १४ डिसेंबर - जोहान्सबर्ग, रात्री ८.३० वाजल्यापासून

 

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाजय शाहबीसीसीआयराहुल द्रविडहार्दिक पांड्या