भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेचा अखेरचा सामना रद्द करण्यात आला. कोरोना प्रादुर्भावाच्या उद्रेकामुळे सामन्यावर गंडांतर आलं. पण कसोटी रद्द करण्याच्या निर्णयावरुन बीसीसीआय आणि इंग्लंड क्रिकेट बोर्डात वाद सुरू आहे. कारण कसोटी रद्द झाल्यामुळे इंग्लंड क्रिकेट बोर्डाला मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरं जावं लागलं आहे. एका अहवालानुसार इंग्लंडला जवळपास ४०७ कोटींचं नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. बीसीसीआयकडे नुकसान भरपाईची मागणी इंग्लंडनं केली आहे. यात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह यांनी इंग्लंडच्या क्रिकेट बोर्डाला कमाईची एक ऑफर देऊ केली आहे.
कोहलीकडून कॅप्टन्सी काढून घेणार? BCCI चे सचिव जय शाह यांनी केलं मोठं विधान
पुढील वर्षात भारतीय संघ पुन्हा एकदा इंग्लंड दौऱ्यावर असणार आहे. या दौऱ्यातील निर्धारित सामन्यांमध्ये अधिकचे दोन टी-२० सामने किंवा एक कसोटी अशी ऑफर जय शाह यांनी इंग्लंड क्रिकेट बोर्डाला दिली आहे. पुढील वर्षीच्या दौऱ्यात जितके टी-२० सामने खेळविण्यात येतील त्यापेक्षा दोन अधिकचे सामने खेळण्यासाठी भारत तयार आहे किंवा त्याजागी एक कसोटी अधिक खेळविण्यात यावी अशी ऑफर बीसीसीआयनं दिल्याची माहिती समोर आली आहे. आर्थिकदृष्ट्या पाहायचं झालं तर बीसीसीआयनं दिलेली ऑफर इंग्लंडच्या फायद्याचीच आहे. पण इंग्लंडकडून त्यावर काय भूमिका घेतली जाते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
पुढील वर्षी भारताचा इंग्लंड दौरापुढल्या वर्षी म्हणजेच २०२२ च्या जुलैमध्ये भारतीय संघ पुन्हा एकदा इंग्लंडचा दौऱ्यावर जाणार आहे. निर्धारित वेळापत्रकानुसार भारतीय संघ इंग्लंडमध्ये तीन टी-२० आणि वनडे मालिका खेळणार आहे. १ जुलैपासून भारताच्या इंग्लंड दौऱ्याला सुरुवात होईल. यात १ जुलै रोजी ओल्ड ट्रॅफर्डवर पहिला सामना, ३ जुलैला ट्रेंटब्रिजवर दुसरा आणि ६ जुलै रोजी तिसरा टी-२० सामना खेळवला जाणार आहे. त्यानंतर ९, १२ आणि १४ जुलै रोजी तीन वनडे सामने खेळवले जाणार आहेत.
"बीसीसीआयनं इंग्लंड क्रिकेट बोर्डासमोर एक प्रस्ताव ठेवला आहे. पुढल्या वर्षी जुलैमध्ये नियोजित इंग्लंड दौऱ्यात तीन ऐवजी ५ टी-२० सामने खेळण्याची आम्ही तयारी दाखवली आहे. जर टी-२० सामना नको असेल तर एक कसोटी सामना अधिकचा खेळण्याचा पर्याय आम्ही दिला आहे", असं जय शाह एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले. दोन्ही पर्यायांपैकी कोणता पर्याय निवडायचा याचा अधिकार पूर्णपणे इंग्लंडकडे असणार आहे, असंही ते म्हणाले आहेत.