जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये झालेल्या मानहानिकारक पराभवानंतर BCCI आता अॅक्शन मोडमध्ये आली आहे. भारताला मागील १० वर्षांत एकही आयसीसी स्पर्धा जिंकता आलेली नाही, त्यात दोनवेळा WTC Final ला पोहोचूनही भारताला जेतेपद पटकावता आलेले नाही. त्यामुळे BCCI नाराज आहे आणि आता त्यांनी टीम इंडियाच्या तीन सदस्यांना वॉर्निंग दिली आहे.
आयसीसी स्पर्धांमधील अपयशानंतर बीसीसीआयने भारतीय क्रिकेट टीमच्या सपोर्ट स्टाफ सदस्यांना वॉर्निंग देण्यात येण्याचे संकेत आहेत. यामध्ये फलंदाज प्रशिक्षक विक्रम राठोड व गोलंदाज प्रशिक्षक पारस म्हाम्ब्रे यांचा समावेश आहे. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या पदाला २०२३च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेपर्यंत काहीच धोका नसला तरी, बीसीसीआय त्यांची स्पर्धेनंतर उचलबांगडी करू शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे. या सर्वांची हकालपट्टी होईल, अशी तरी सध्या परिस्थिती नाही, परंतु बीसीसीआयने आगामी वन डे वर्ल्ड कप डोळ्यासमोर ठेऊन राठोड व म्हाम्ब्रे यांच्याशी चर्चा केली आहे. वर्ल्ड कपला अद्याप ४ महिने शिल्लक आहेत.
भारतीय संघाचा सपोर्ट स्टाफमुख्य प्रशिक्षक - राहुल द्रविड फलंदाज प्रशिक्षक - विक्रम राठोडगोलंदाज प्रशिक्षक - पारस म्हाम्ब्रेक्षेत्ररक्षण प्रशिक्षक - टी दिलीप
''हे इतकं सोपं नाही. या सर्वांची कामगिरी खराब झालीय, असं आपण म्हणू शकत नाही. आम्ही भारतात विजय मिळवले आहेत. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहोचलो, ही सोपी गोष्ट नाही. पण, परदेशातील कामगिरी समाधानकारक झालेली नाही. चार महिन्यांवर वर्ल्ड कप स्पर्धा आली आहे आणि त्यामुळे आता चूक करून चालणार नाही. त्यासाठी या सर्वांशी चर्चा मात्र नक्की केली जाईल,''असे बीसीसीआयच्या सूत्रांनी इनसाइड स्पोर्ट्सला सांगितले.
फलंदाज प्रशिक्षक विक्रम राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाच्या आघाडीच्या प्रमुख फलंदाजांना अपयश आल्याचे पाहायला मिळतेय. भरत अरूण यांनी राजीनामा दिल्यानंतर म्हाम्ब्रे गोलंदाज प्रशिक्षक म्हणून आले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गोलंदाजांनी काही चांगली कामगिरी केली. त्यात त्यांच्या कार्यकाळात दुखापतीचे सत्रही वाढले.