BCCIच्या वार्षिक सर्वसाधारण सभेबाबत मोठी अपडेट समोर येत आहे. इंडियन प्रीमिअर लीगचे ( Indian Premier League) १३वे पर्व यूएईत यशस्वीपणे पार पाडल्यानंतर २०२१च्या आयपीएलच्या हालचालींना वेग आला. आयपीएलच्या १३व्या पर्वात महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सला ( CSK) अपयशाचे तोंड पाहावे लागले. त्याचबरोबर अन्य संघांनाही मोठे धक्के बसले. त्यामुळे २०२१साठी नव्यानं लिलाव ( Auction) होण्याचीही चर्चा सुरू होती. तसेच पुढील वर्षी दोन नवीन संघही मैदानावर उतरणार असल्याची चर्चा आहे. BCCIच्या वार्षिक सर्वसाधारण सभा २४ डिसेंबरला होणार आहे आणि त्यात यावर निर्णय घेतले जाणार आहेत.
आयपीएलमध्ये दोन नव्या संघांसाठी अदानी ग्रुप आणि गोएंका हे शर्यतीत आहेत. अदानी ग्रुप व संजिव गोएंका ग्रुप आयपीएलचा नवा संघ खरेदी करण्यासाठी उत्सुक आहेत. यापैकी एक संघ हा अहमदाबादचा असेल आणि तो अदानी ग्रुप खरेदी करण्याची शक्यता अधिक आहे. दुसऱ्या संघासाठी कानपूर, लखनौ आणि पुणे यांच्या नावाची चर्चा आहे. संजिव गोएंका ग्रुपनं 2016 व 2017 च्या आयपीएलमध्या रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघ मैदानावर उतरवला होता आणि त्या संघाला अनुक्रमे सातव्या व दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. InsideSport ने दिलेल्या वृत्तानुसार या बैठकीत बीसीसीआय दोन नव्या संघांना मान्यता देण्याच्या तयारीत आहे. पण, २०२२च्या आयपीएलमध्ये १० संघ खेळतील. २०२१ची आयपीएल आहे त्याच ८ संघांमध्ये होणार आहे.
BCCIच्या सूत्रांनी सांगितले की, दोन नवीन संघांचा समावेश करण्यासाठी फार कमी कालावधी आहे. टेंडर, खेळाडूंचा लिलाव आणि सर्वात महत्त्वाचे स्टेकहोल्डर या सर्व बाबी कमी कालावधीत होणे शक्य नाही. त्यामुळे २०२१च्या आयपीएलमध्ये ८ संघच खेळतील. २०२२मध्ये नव्या संघांचा समावेश केला जाईल. स्टार सोबतचा करार २०२१मध्ये संपुष्टात येत आहे. त्यामुळे दोन नवीन संघांचा समावेश केल्यानंतर नव्या करारासाठी आम्ही वाढीव रक्कम आकारू शकतो. वार्षिक सर्वसाधारण सभेत नव्या संघांबाबतचा निर्णय घेतला जाईल. पण, २०२१मध्ये तरी हे शक्य नाही.''
१० संघांचा समावेश म्हणजे होम-अवे असे एकूण ९४ सामने होतील आणि त्यामुळे स्पर्धेचा कालावधीही वाढेल. तसेच पुढील वर्षी होणाऱ्या आयपीएलसाठी मिनी ऑक्शन फेब्रुवारीत होणार असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली.