इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) १३व्या पर्वाच्या यशस्वी आयोजनानंतर BCCIनं आयपीएल २०२१च्या पर्वाच्या तयारीला सुरुवात केली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( BCCI) वार्षिक सर्वसाधारण बैठक २४ डिसेंबरला होणार आहे आणि त्यात IPL 2021साठी दोन नवीन संघांना मान्यता देण्याची तयारी बीसीसीआयनं केल्याचे वृत्त समोर येत आहे. यापैकी एक अहमदाबाद संघासाठी अदानी उद्योग समुहाचे नाव समोर येत आहे, तर दुसऱ्या संघासाठी कानपूर, लखनौ व पुणे या नावांची चर्चा आहे.
बीसीसीआयनं वार्षिक सर्वसाधारण बैठकीची कार्यक्रम पत्रिका सर्व संलग्न संघटनांना दिली आहे. या बैठकीत २३ मुद्दे चर्चिले जाणार असल्याचे बीसीसीआयनं सांगितले. या बैठकीत अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांच्या पदावरही चर्चा केली जाणार आहे. ९ डिसेंबरला सर्वोच्च न्यायलयात या दोघांना पदावर कायम राहता यावे यासाठी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात निकाल लागणार आहे.
दोन संघांसाठी कोण शर्यतीत? अदानी ग्रुप व संजिव गोएंका ग्रुप आयपीएलचा नवा संघ खरेदी करण्यासाठी उत्सुक आहेत. यापैकी एक संघ हा अहमदाबादचा असेल आणि तो अदानी ग्रुप खरेदी करण्याची शक्यता अधिक आहे. दुसऱ्या संघासाठी कानपूर, लखनौ आणि पुणे यांच्या नावाची चर्चा आहे. संजिव गोएंका ग्रुपनं 2016 व 2017 च्या आयपीएलमध्या रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघ मैदानावर उतरवला होता आणि त्या संघाला अनुक्रमे सातव्या व दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते.
फ्रँचायझींमध्ये मतभिन्नता...
मेगा ऑक्शन संदर्भात काही फ्रँचायझी नाखुश आहेत. बऱ्याच फ्रँचायझींनी त्यांची कोर टीम तयार केली आहे आणि त्या टीमलाच प्रोत्साहन देण्याचा त्यांचा मानस आहे. अशात लिलाव घेण्यात आल्यास त्यांना सर्वाधिक फटका बसू शकतो. पण, लिलाव झाल्यास काही संघांना नव्यानं संघबांधणी करणे शक्य होईल आणि त्यामुळे त्यांचा या लिलावाला पाठींबा आहे, असे सूत्रांनी सांगितले.
मेगा ऑक्शन झाल्यास सर्वाधिक फायदा हा चेन्नई सुपर किंग्सला होईल. पुढील पर्वासाठी ते संपूर्ण संघ बदलण्याची शक्यता आहे. शेन वॉटसननं निवृत्ती घेतली आहे, तर इम्रान ताहीर, पीयूष चावला, हरभजन सिंग, मुरली विजय, केदार जाधव यांना संघ रिलीज करू शकतो. त्यामुळे त्यांना ऑक्शनची गरज आहे.
अंतिम ११मध्ये आता ५ परदेशी खेळाडू?फ्रँचाझींना भारतीय खेळाडूंमध्ये स्पार्क सापडत नाही, त्यामुळे संघ संख्या वाढल्यास त्यांना क्वालिटी खेळाडू मिळवताना जड जाईल. त्यामुळे बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं अंतिम ११मधील परदेशी खेळाडूंची संख्या ५ करावी असा पर्याय सूचवला आहे.