गौतम गंभीर आणि विराट कोहली या जोडी एकत्र खेळीचा किस्साही गाजला अन् एकमेकांविरोधातील मैदानातील भांडणंही चर्चेत राहिली. देशासाठी एकत्र खेळताना आपल्याला मिळालेला 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार कोहलीला देण्याचा मोठेपणा गंभीरनं दाखवला होता. पण आयपीएलच्या मैदानात दोघांच्यामध्ये जानी दुश्मनीचा सीन पाहायला मिळाला. दोघेही आक्रमक असल्यामुळे ते समोरासमोर आल्यावर वादाच्या ठिणगीचा भडगा उडाल्याचे दिसून आले. या गोष्टमुळेच गौतम गंभीर टीम इंडियाचा कोच झाल्यावर विराट कोहलीसोबत त्याचं पटणार का? हा एक मोठा प्रश्न होता. पण दोघांच्यात अगदी ऑल इज वेल सीन असल्याचे दिसत आहे. बीसीसीआयने दोघांच्यातील गोडवा आणखी वाढवण्यासाठी भन्नाट डाव खेळला. ज्याची सोशल तुफान चर्चा रंगताना दिसते.
गंभीर-कोहली यांच्यातील गप्पा गोष्टीची चर्चा
बांगलादेश विरुद्धच्या कसोटी सामन्याआधी बीसीसीआने विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्या मुलाखतीचा एक खास टीझर शेअर केला आहे. यात टीम इंडियाचा कोच गंभीर आणि स्टार क्रिकेटर कोहली अगदी मनमोकळेपणाने एकमेकांसोबत गप्पा मारताना दिसून येते. यावेळी गंभीर ऑस्ट्रेलिया दौऱ्यात किंग कोहलीनं केलेल्या अप्रतिम खेळीवर भाष्य करताना दिसते. एवढेच नाही तर तो न्यूझीलंडविरुद्ध नेपियरमध्ये खेळलेल्या आपल्या शतकी खेळीचा उल्लेख करतानाही पाहायला मिळते. खेळाडूसाठी आपल्या झोनमध्ये असणं किती महत्त्वाचे असते, त्यावर गंभीर जोर देताना दिसते.
मैदानातील खुन्नस अन् त्यावर विराटनं गंभीरला विचारलेला खास प्रश्न
गप्पा गोष्टी करताना विराट कोहली हा कोच गौतम गंभीर याला मैदानातील खुन्नस /स्लेजिंगच्या मुद्यावर खास प्रश्न विचारतानाही पाहायला मिळते. प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूसोबत शाब्दिक वाद व्हायचा त्यावेळी त्या घटनेमुळे लक्ष विचलत व्हायचं की, अधिक प्रेरणा मिळायची? असा प्रश्न विराट कोहलीनं गौतीला विचारला होता. यावर कोचनं त्याचीच फिरकी घेतल्याचे पाहायला मिळाले.
किंग कोहलीच्या गंभीर प्रश्नावर कोचकडून असा आला रिप्लाय
विराट कोहलीच्या प्रश्नावर उत्तर देताना गंभीरनं त्याच्यावरच निशाणा साधला. मैदानात माझ्यापेक्षा तू अनेकदा प्रतिस्पर्ध्याला खुन्नस देतो. अशा गोष्टी तू अधिक वेळा केल्या आहेस. त्यामुळे याचं उत्तर तूच चांगल्या प्रकारे देऊ शकतोस, असा रिप्लाय गंभीरनं दिला. यावर दोघांनाही हसू अनावर झाल्याचे दिसून आले.