नवी दिल्ली, दि. 12 - टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी शनिवारी बीसीसीआयला खेळाडूंच्या विश्रांतीकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला होता. शास्त्रींच्या सल्ल्यानंतर माजी कर्णधार कपिल देव यांनीही बीसीसीआयला खेळाडूंना जास्तीत जास्त विश्रांती मिळावी यासाठी एक स्वतंत्र विमान घेण्याचा सल्ला दिला आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना कपिल देव यांनी हे वक्तव्य केले आहे.
बीसीसीआय क्रिकेटमध्ये भरपूर पैसा कमावत आहे. त्यामुळे बीसीसीआय स्वतंत्र विमान सहज खरेदी करू शकते. खेळाडूंसाठी बीसीसीआयने खासगी विमान खरेदी करावे. स्वतंत्र विमानामुळे खेळाडूंचा वेळही वाचेल आणि त्यांना विश्रांतीही भरपूर मिळेल. तसेच बीसीसीआयने याआधीच याबाबत निर्णय घ्यायला हवा होता, असेही कपिल देव म्हणाले.
अमेरिकेच्या गोल्फ खेळाडूकडे स्वत:चे विमान आहे. येत्या काही वर्षांमध्ये हिंदुस्थानी खेळाडूही स्वतंत्र विमान खरेदी करू शकतात. बीसीसीआय त्यासाठी पार्किंगचे पैसे देण्याची तयारी दाखवण्यास मागेपुढे पाहणार नाही, असे कपिल देव म्हणाले. बीसीसीआयने ३० ते ४० लोक बसतील असे विमान खरेदी केल्यास काही लोकांनी नोकरीची संधीही उपलब्ध होईल, असे कपिल देव म्हणाले.
तसेच १०० प्रवासी बसतील एवढ्या ए-३१८ विमानाची किंमत ५०० कोटी आहे आणि हा खर्च बीसीसीआय सहजपणे करू शकते, असेही कपिल देव म्हणाले. याआधी एकामागोमाग होणारे आंतरराष्ट्रीय सामने, विमान प्रवासामुळे खेळाडू लवकर थकत आहेत. त्यामुळे बीसीसीआयने आंतरराष्ट्रीय सामन्यांचे वेळापत्रक बनवताना खेळाडूंच्या विश्रांतीकडेही लक्ष द्यावे, असे प्रशिक्षक रवी शास्त्री म्हणाले होते.
आंतरराष्ट्रीय सामन्यांचे वेळापत्रक तयार करताना खेळाडूंच्या विश्रांतीचाही विचार करावा आंतरराष्ट्रीय सामन्यांचे वेळापत्रक तयार करताना खेळाडूंच्या विश्रांतीचाही विचार करावा, अशी मागणी रवी शास्त्री यांनी केली. सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेली प्रशासक समिती, बोर्डाचे सीईओ राहुल जोहरी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलताना रवी शास्त्रींनी ही मागणी केल्याचे म्हटले आहे. सततच्या व्यस्त वेळापत्रकामुळे खेळाडूंच्या फिटनेसवर परिणाम होतो, असे रवी शास्त्री यांनी म्हटले आहे. या वर्षाच्या सुरुवातीला भारतीय संघाने बांगलादेशविरुद्ध एकमेव कसोटी सामना खेळला. त्यानंतर मार्चमध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया चार कसोटी सामन्यांची मालिका झाली. त्यानंतर मार्च आणि एप्रिलमध्ये आयपीएलमध्ये खेळाडू व्यस्त होते. आयपीएलनंतर तातडीने भारतीय संघ इंग्लंडमध्ये खेळवण्यात आलेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी रवाना झाला. चॅम्पियन्स ट्रॉफी संपताच इंग्लंडहूनच भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी रवाना झाला. वेस्ट इंडिजमध्ये 5 वन डे आणि एक टी-20 सामना खेळवण्यात आला.वेस्ट इंडिजहून परतताच भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध 5 वन डे, 3 कसोटी सामने आणि एक टी-20 खेळण्यासाठी रवाना झाला. त्यानंतर भारतीय संघ आता मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5 वन डे आणि 3 टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. यानंतरही भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध 3 वन डे आणि 3 टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यामुळे या सर्वात बीसीसीआयने आंतरराष्ट्रीय सामन्यांचं नियोजनपूर्वक वेळापत्रक तयार करावे असे खेळाडू आणि रवी शास्त्री यांचे म्हणणे आहे.