harmanpreet kaur : बांगलादेशच्या महिला संघाने वन डे मालिका अनिर्णित करून भारताच्या तोंडचा घास पळवला. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेला सामना अनिर्णित करून यजमान संघाने एकप्रकारे 'विजय'च मिळवला. पण, भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नाट्यमय घडामोडींमुळे हा सामना फारच चर्चेत राहिला. अम्पायरने वादग्रस्त निर्णयावर बाद दिल्याचा आरोप करत हरमनने जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. सामन्यानंतर बोलताना हरमनने काही गंभीर आरोप करत प्रश्न उपस्थित केले. काही निर्णयांवर समाधानी नसून अत्यंत खराब अम्पायरिंग पाहायला मिळाली, असे हरमनने सांगितले.
भारतीय कर्णधाराचा आरोप "मला वाटते की या सामन्यातून आम्हाला खूप काही शिकायला मिळाले. क्रिकेटशिवाय इथे अम्पायरिंगचा हा प्रकार पाहून मी थक्क झाले. जेव्हा आम्ही पुढच्या वेळी येऊ तेव्हा आम्ही अशा प्रकारच्या अम्पायरिंगसाठी आधीच तयार असू. मी या आधीही सांगितले होते की, इथे अत्यंत खराब अम्पायरिंग आहे. काही निर्णयांमुळे मी दुखावले आहे", असे भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने म्हटले.
हरमनच्या या कृत्यावरून क्रिकेट वर्तुळात चर्चा रंगली असतानाच भारतीय पुरूष संघाचे माजी खेळाडू मदन लाल यांनी तिच्यावर सडकून टीका केली. "बांगलादेशविरूद्धच्या सामन्यात हरमनप्रीत कौर ज्या पद्धतीने वागली ते योग्य नाही. ती खेळापेक्षा मोठी असू शकत नाही. तिने भारतीय क्रिकेटचे नाव खराब केले आहे. त्यामुळे बीसीसीआयने तिच्यावर कडक कारवाई करायला हवी", असे १९८३ च्या विश्वविजेत्या संघाचे सदस्य असलेल्या मदन लाल यांनी म्हटले.
हरमन का संतापली?दरम्यान, भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरच्या वादग्रस्त विकेटने अनेकांचे लक्ष वेधले. अम्पायरने बाद देताच हरमनने संताप व्यक्त करत स्टम्पच्या दिशेने बॅट भिरकावली. स्वीप मारण्याच्या प्रयत्नात असलेली हरमन फसली अन् बांगलादेशी खेळाडूंनी विकेटसाठी अपील केली. खरं तर स्लिपमध्ये झेलचा दावा केला त्यासाठी अपील केली गेली. मात्र, अम्पायरने तिला LBW बाद घोषित करताच हरमनचा राग अनावर झाला. हरमनप्रीत १४ धावा करून तंबूत परतली.
बांगलादेशने दिलेल्या २२६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून स्मृती मानधना आणि हरलीन देओल यांनी अर्धशतकी खेळी केली. खरं तर अखेरच्या २ षटकांमध्ये भारताला विजयासाठी ९ धावांची गरज होती तर बांगलादेशला १ विकेट हवी होती. सेट फलंदाज जेमिमा खेळपट्टीवर टिकून होती. पण मेघना सिंहला बाद करण्यासाठी बांगलादेशने रणनीती बनवली. मेघनाने ४९वे षटक चांगले खेळले. जेमिमा फलंदाजी करत असताना ४९व्या षटकातील पहिले २ चेंडू निर्धाव गेले. मग तिने एक धाव काढून मेघनाला फलंदाजीची संधी दिली. चौथा चेंडू मेघनाने निर्धाव खेळला तर पाचव्या चेंडूवर चौकार लगावला. सहाव्या चेंडूवर एक धाव काढून मेघनाने स्ट्राईक आपल्याकडे ठेवले. अखेरच्या षटकात भारताला विजयासाठी ३ धावांची गरज होती. पहिल्या दोन चेंडूंवर १-१ धाव काढून मेघनाने विजयाकडे कूच केली. पण तिसऱ्या चेंडूवर मेघनाच्या बॅटला स्पर्श करून चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात गेला अन् बांगलादेशने भारताच्या तोंडचा घास पळवला आणि सामना अनिर्णित झाला.