Team India Test Captaincy Sourav Ganguly: भारताचा नवा कसोटी कर्णधार म्हणून विराट कोहलीचा उत्तराधिकारी शोधण्याचा प्रयत्न सध्या BCCI कडून सुरू आहे. रोहित शर्मा, केएल राहुल, ऋषभ पंत आणि जसप्रीत बुमराह अशी काही नावे आतापर्यंत चर्चेत आली आहेत, पण BCCI ने अद्याप याबाबत निर्णय जाहीर केलेला नाही. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने कसोटी कर्णधार निवडीचा निर्णय निवड समितीकडे असल्याचं सांगितलं असतानाच नव्या कसोटी कर्णधाराची निवड नक्की कशी केली जाईल, याबद्दल माहिती दिली.
"साहजिकच कर्णधार बनण्यासाठी काही गोष्टींचा विचार केला जातो. कसोटी संघाचा कर्णधार बनण्यासाठी काही नियम असतात. जो खेळाडू त्या नियमांची आणि अपेक्षांची पूर्तता करू शकत असेल त्यालाच नवा भारतीय कसोटी कर्णधार म्हणून नेमण्यात येईल. मला विश्वास आहे की निवड समितीच्या मनात एक नाव असेल आणि ते बीसीआय अध्यक्ष, सचिव आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतील आणि योग्य वेळी कर्णधाराची घोषणा केली जाईल", गांगुलीने पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
गेल्या काही दिवसांपासून गांगुलीवरही निवड समितीच्या बैठकांमध्ये उपस्थिती लावून संघ निवडीच्या निर्णयांमध्ये हस्तक्षेप केल्याचा आरोप केला जात आहे. विराट कोहली, रोहित शर्मा, जय शाह आणि इतर काही जणांसोबत बसलेले त्याचे छायाचित्रही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सौरव गांगुलीला या आरोपांबद्दल विचारले असता, बीसीसीआयच्या अध्यक्षांची जी कर्तव्य असतात ती मी करतो, असं उत्तर दिलं. "मला वाटत नाही की मी कोणाला काही उत्तर देण्यासाठी आणि बिनबुडाच्या आरोपांना मान देण्यासाठी बांधील आहे. मी बीसीसीआयचा अध्यक्ष आहे आणि बीसीसीआयच्या अध्यक्षांनी काय केलं पाहिजे ते मी करतो", असं तो म्हणाला आहे.