मुंबई : पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानशी खेळावे की नाही, हा प्रश्न ऐरणीवर आहे. पण विश्वचषकात पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याबाबत बीसीसीआयने मात्र अजूनही कोणतीच भूमिका घेतली नसल्याचे आयसीसीने स्पष्ट केले आहे. आयसीसीचे अधिकारी डेव्ह रिचर्डसन यांनी आज ही माहिती दिली.
भारताच्या बऱ्याच खेळाडूंनी शहीद जवानांच्या कुटुंबियांसाठी मदत जाहीर केली आहे. त्याचबरोबर बीसीसीआयनेही मदतीचा हात पुढे केला आहे. बीसीसीआयच्या माजी सचिवांनी तर खेळापेक्षा देश नक्कीच मोठा आहे, असे स्पष्ट मत व्यक्त केले आहे. भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरनेही आता पाकिस्तानशी चर्चा करण्यात काहीच अर्थ नसल्याचे म्हटले होते. भारताचा फिरकीपटू हरभजन सिंगने तर भारताने पाकिस्तानबरोबर विश्वचषकातही खेळू नये, अशी भूमिका घेतली होती. बीसीसीआयचे माजी सचिव संजय पटेल यांनी हरभजनच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे. त्याचबरोबर देशापेक्षा खेळ कधीच मोठा होऊ शकत नाही, असे विधानही केले आहे.
भारतीय जनतेच्या भावना बीसीसीआयने समजून घेतल्या असल्या तरी विश्वचषकातील पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याबाबत त्यांनी शांत राहणे पसंत केले आहे. कारण जर बीसीसीआयने विश्वचषकात पाकिस्तानबरोबर खेळायचे नसेल, तर त्या आशयाचे पत्र त्यांनी आयसीसीला देणे अनिवार्य असेल.
रीचर्डसन म्हणाले की," दोन्ही देशांतील वातावरणावर आम्ही नजर ठेवून आहोत. विश्वचषकात दोन्ही देशांच्या सामन्यांची तिकिट विक्री होणार आहे. पण अजूनही बीसीसीआय किंवा पीसीबी यांनी या सामन्याबाबत आपले मनोगत व्यक्त केलेले नाही. जर दोन्ही देशांच्या क्रिकेट मंडळांना काहीच समस्या जाणवत नसेल तर नक्कीच हा सामना होऊ शकतो."
पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात संतापाची लाट उसळली आहे. पाकिस्तानच्या या भ्याड हल्ल्यांना सडेतोड उत्तर द्या, असा सूर देशभरात उमटत आहे. या हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले आणि त्यानंतर पाकिस्तानशी सर्व संबंध तोडण्याचे कार्य सुरू झाले. देशवासीयांप्रमाणे सेलेब्रिटीनींही या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. आगामी क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेत भारताने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार घालावा, अशी मागणी जोर धरत आहे.