नवी दिल्ली: आयपीएल टायटल प्रायोजक चीनची मोबाईल कंपनी विवोने माघार घेतली आहे. भारतातील सर्वांत मोठा उद्योग समूह असलेल्या टाटा समूहाने टायटल प्रायोजक म्हणून विवोची जागा घेतली. आयपीएल संचालन परिषदेचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी मंगळवारी ही माहिती दिली.
लीगसोबतच्या प्रायोजकत्व करारासाठी विवोकडे २०१८ ते २०२२ पर्यंतचा अवधी आहे; परंतु या काळात टाटा मुख्य प्रायोजक राहील. या लीगचे नाव आता टाटा आयपीएल असेल. विवोने २०१८ मध्ये वार्षिक ४४० कोटी रुपये खर्चून टायटल हक्क विकत घेतले होते. चिनी स्मार्टफोन निर्मात्यांनी २०२० मध्ये भारत-चीन राजनैतिक वादामुळे हा करार एका वर्षासाठी थांबविला. त्यावेळी हे अधिकार ड्रीम इलेव्हनला हस्तांतरित करण्यात आले.
मंगळवारच्या बैठकीनंतर, टाटा समूह २०२२ आणि २०२३ हंगामासाठी टायटल प्रायोजक राहील, असा निर्णय घेण्यात आला. नव्याने प्रायोजक शोधण्यासाठी दोन वर्षांनी पुन्हा प्रयत्न केले जाणार आहेत. मात्र, तोपर्यंत टाटा हेच आयपीएलचे मुख्य प्रायोजक असतील असं आयपीएल समितीने म्हटले आहे.
बीसीसीआयला मिळतील ११२४ कोटी रुपये!
टाटा समूह आयपीएल टायटल प्रायोजनापोटी दोन वर्षांच्या करारापोटी ६७० कोटी रुपये देईल. दुसरीकडे विवो करार रद्द करण्यासाठी ४५४ कोटी देईल. याचा अर्थ बीसीसीआयला २०२२-२०२३ च्या सत्रासाठी ११२४ कोटी मिळतील. बोर्डाला २०२२ ला ५४७ आणि २०२३ ला ५७७ कोटी रुपये मिळतील. मिळालेल्या माहितीनुसार विवोने २०२२ आणि २०२३ च्या टायटल प्रायोजकासाठी ९९६ कोटींचा करार केला होता. यंदापासून दहा संघ असल्याने आता हे मूल्य वाढले.
टाटा समूह ३३५ कोटी प्रत्येक वर्षाला म्हणजे ६७० कोटी मोजेल. त्यात ३०१ कोटी अधिकार शुल्क आणि ३४ कोटी रुपये सामन्यांची संख्या वाढल्याबद्दल असतील. विवोने करार रद्द केल्याने फरकाची रक्कम म्हणून २०२२ साठी १८३ कोटी आणि २०२३ साठी २११ कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. याशिवाय त्यांना दोन्ही वर्षांचे असाईनमेंट शुल्क द्यावे लागेल. प्रायोजन रकमेतील ५० टक्के वाटा बीसीसीआय स्वत:कडे ठेवते. उर्वरित रक्कम आयपीएल फ्रॅन्चायजींमध्ये वितरित केली जाते.
म्हणून ‘टाटा’कडे आले प्रायोजकपद
विवोचा दोन वर्षांचा करार शिल्लक असताना अचानक टाटा कंपनीला टायटल स्पॉन्सर का बनविण्यात आलं यासंदर्भातील पडद्यामागील घडामोडी समोर आल्यात. एएनआय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आयपीएलच्या समितीने टाटांना मुख्य प्रायोजक म्हणून निवडण्यामागे विवोने घेतलेला एक निर्णय कारणीभूत ठरला.
विवोने २०१८ मध्ये वर्षाला ४४० कोटी रुपये खर्च करुन २२०० कोटी रुपयांत टायटल प्रायोजक हक्क विकत घेतले होते. मात्र, कंपनीने अचानक माघार घेतली आहे. ‘आम्ही टाटांकडे मुख्य प्रायोजक म्हणून पाहत आहोत. विवोला त्यांचा करार रद्द करायचा आहे. या कराराची दोन वर्षे अद्यापही बाकी आहेत. त्यामुळेच या दोन वर्षांच्या कालावधीसाठी टाटा हेच मुख्य प्रायोजक असतील,’ अशी माहिती या घडामोडींशी संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.