मुंबई : ऑस्ट्रेलियाचा संघ फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात ऑस्ट्रेलियाचा संघ पाच वन डे आणि दोन ट्वेंटी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. मात्र, या दौऱ्यात किंचितसा बदल करण्यात आला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिली ट्वेंटी-20 मालिका खेळवण्यात येणार आहे. नियोजित वेळापत्रकानुसार पहिला सामना 24 फेब्रुवारीला बंगळुरु येथे खेळवण्यात येणार होता, परंतु सुरक्षेचा कारणास्तव हा सामना आता विशाखापट्टणम येथे होणार आहे, तर विशाखापट्टणम येथे होणारा दुसरा सामना बंगळुरुला मिळाला आहे.
''24 फेब्रुवारीला होणाऱ्या International Aero India Show मुळे येथे क्रिकेट सामना खेळवणे अवघड आहे. तसेच खेळाडूंच्या राहण्याच्या सोयीसह, सुरक्षेच्या समस्याही उद्भवण्याची शक्यता आहे. त्यामुळे आम्ही बीसीसीआयला ट्वेंटी-20 सामना इतरत्र हलवण्याची विनंती केली होती,'' असे कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेकडून सांगणम्यात आले आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेला ट्वेंटी-20 सामन्याने 24 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. दोन सामने अनुक्रमे विशाखापट्टणम व बंगळुरु येथे होतील. पाच सामन्यांची वन डे मालिका 2 मार्चपासून सुरु होईल आणि पहिला सामना हैदराबाद येथे होईल. त्यानंतर नागपूर ( 5 मार्च), रांची ( 8 मार्च), मोहाली ( 10 मार्च ) व दिल्ली ( 13 मार्च ) असे सामने होतील. दुसरीकडे ऑस्ट्रेलिया मार्च व एप्रिलमध्ये पाकिस्तानविरुद्ध मालिका खेळणार आहे.