BCCI Big Decision: गेल्या एका वर्षात BCCIने असे अनेक मोठे निर्णय घेतले ज्याने भारतीय क्रिकेटमध्ये क्रांतिकारी बदल घडवून आणले. विशेषत: महिला क्रिकेटमध्ये प्रथमच महिला आणि पुरुष खेळाडूंची मॅच फी समान करण्यात आली. त्यानंतर महिला IPLची घोषणा झाली आणि आता पुन्हा एकदा BCCIने मोठा निर्णय घेतला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने घेतलेला निर्णय नक्कीच भारतीय क्रिकेटमध्ये क्रांती घडवेल असे बोलले जात आहे. चला पाहूया काय आहे ती गोष्ट.
यापुढे महिला पंचांनाही रणजी ट्रॉफीमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे. आजपर्यंत हे कधीच घडलेले नव्हते. BCCI लवकरच महिलांसाठी अंपायरिंग चाचणी घेणार आहे. याबाबत ड्राफ्टमध्ये समाविष्ट केलेल्या महिला देशांतर्गत क्रिकेटमध्ये अंपायरिंग करताना दिसतील. ड्राफ्टसाठी निवडण्यात आलेल्या तीन महिला सध्या सामन्यांदरम्यान ऑफिशिएटिंग (स्कोअररचे काम आणि इतर विविध मैदानी काम) करतात. यंदाच्या रणजी ट्रॉफी मोसमातही ते पंचांची कामगिरी करतानाही दिसणार आहेत.
रणजी ट्रॉफीसाठी दिसणार 'या' 3 महिला पंच
रणजी करंडक स्पर्धेसाठी यावेळी ज्या तीन महिलांची निवड करण्यात आली आहे, त्यात मुंबईच्या वृंदा राठी, चेन्नईच्या जननी नारायण आणि गायत्री वेणुगोपालन यांचा समावेश आहे. हे तिघेही रणजी ट्रॉफीच्या या मोसमात काम करणार आहेत. BCCIच्या अधिकाऱ्याने इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, लवकरच रणजी ट्रॉफीमध्ये महिला पंचही दिसणार आहेत. पुढील हंगामासाठी, महिला पंचांची यादी तयार केली जाईल. त्या यादीतील महिला पंच चाचणी उत्तीर्ण झाल्यानंतर देशांतर्गत स्पर्धांमध्ये भाग घेऊ शकतील.