Join us  

टी-20 मध्ये अंपायर्सची गंभीर चूक ; 2 धावांसाठी राडा, बीसीसीआयने मागवला रिपोर्ट

सामना संपल्यानंतरही  हैदराबादचा कर्णधार अंबाती रायडू आणि संघाने आक्रमक पवित्रा घेत मैदानातच ठाणं मांडलं. त्यामुळे आंध्र प्रदेश आणि केरळमधील सामना वेळेवर सुरू होऊ शकला नाही. 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2018 11:00 AM

Open in App

विशाखापट्टणम : कर्नाटकच्या डावादरम्यान अंपायर्सनी केलेली चूक हैदराबादच्या संघाला चांगलीच महागात पडली. या चूकीमुळे हैदराबादला अवघ्या दोन धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. सय्यद मुश्ताक अली टी-20 मध्ये अत्यंत अटीतटीच्या झालेल्या सामन्यात कर्नाटकने हैदराबादच्या संघावर अवघ्या दोन धावांनी विजय मिळवला. अंपायरच्या चुकीमुळे कर्नाटकच्या धावसंख्येत दोन धावांची भर पडली आणि  अखेर दोन धावांनीच हैदराबादचा पराभव झाला. त्यानंतर हैदराबादचे खेळाडू चांगलेच नाराज झाले, अखेरीस धावसंख्येत बदल केल्यामुळेच पराभव झाल्याचं खेळाडूंचं म्हणणं होतं. दुस-या षटकातील चौथ्या चेंडूवर हैदराबादचा खेळाडू मेहंदी हसनने सीमा रेषेवर चेंडू अडवला.  हसनच्या पायाने सीमा रेषेला स्पर्ष केला होता.  पण त्यावेळी पंचांनी रिप्ले पाहण्याची तसदी न घेता केवळ दोन धावा दिल्या.  या सामन्यात कर्नाटकने प्रथम फलंदाजी करताना करुण नायरच्या 77 आणि गौतम गंभीरच्या 57 धावांच्या खेळीच्या बळावर 20 षटकांमध्ये 5 बाद 203 पर्यंत मजल मारली. पण हैदराबादची फलंदाजी सुरू होण्यापूर्वी अंपायर उल्हास गंधे आणि अभिजीत देशमुख यांनी कर्नाटकच्या धावसंख्येत दोन धावांची वाढ केली. म्हणजे 5 बाद 205 अशी नवी धावसंख्या कर्नाटकची झाली. हैदराबादने अखेरच्या षटकापर्यंत पराभव स्वीकारला नाही, मात्र त्यांना बरोबर 9 बाद 203 धावांपर्यंतच मजल मारता आली, आणि अवघ्या दोन धावांनी त्यांचा पराभव झाला.हैदराबादची फलंदाजी सुरू होण्यापूर्वी  हैदराबादचा कर्णधार अंबाती रायडू आणि कर्नाटकचा कर्णधार विनय कुमार यांचा अंपायरसोबत वाद देखील झाला. सामना संपल्यानंतरही  हैदराबादचा कर्णधार अंबाती रायडू आणि संघाने आक्रमक पवित्रा घेत मैदानातच ठाणं मांडलं. त्यामुळे आंध्र प्रदेश आणि केरळमधील सामना वेळेवर सुरू होऊ शकला नाही. आंध्र प्रदेश आणि केरळचा सामना केवळ 13 षटकांचाच होऊ शकला, ज्यामध्ये आंध्र प्रदेशने केरळवर 6 विकेट्स राखून मात केली.

बीसीसीआयने कर्नाटक आणि हैदराबाद यांच्यात खेळवण्यात आलेल्या या सामन्याची माहिती घेतली आहे. मॅच रेफ्रीकडून अहवाल मागवण्यात आला असून त्यानंतर बीसीसीआय आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी दोषींवर कारवाई करणार आहे.

 

टॅग्स :बीसीसीआयभारतीय क्रिकेट संघ