सौराष्ट्र : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला कसोटी सामना ४ ऑक्टोबरला राजकोट येथे सुरु होणार आहे. या सामन्यासाठी वेस्ट इंडिजच्या संघाने सराव करायला सुरुवात केली आहे. दुसरीकडे कर्णधार विराट कोहली पुन्हा एकदा भारताचे नेतृत्व करायला सज्ज झाला आहे. पण मैदानात परतताना कोहलीने बीसीसीआयकडे एक मागणी केली आहे आणि कोहलीच्या या मागणीपुढे बीसीसीआय झुकल्याचे सांगितले जात आहे.
आतापर्यंत कोहलीने जे काही मागितले, ते नियमानुसार असो किंवा नसो, बीसीसीआयने त्याला ते दिले आहे. कोहलीच्या म्हणण्यानुसारच रवी शास्त्री यांना संघाचे मुख्य प्रशिक्षकपद देण्यात आले, हे जगजाहीर आहे. त्यानंतर पुन्हा एकदा कोहलीने बीसीसीआयकडे एक मागणी केली आहे आणि बीसीसीआयनेदेखील या मागणीला हिरवा कंदील दाखवला आहे.
वेस्ट इंडिजविरुद्धचा पहिला सामना राजकोट येथे सुरु होणार आहे. राजकोटची खेळपट्टी ही पाटा आहे. पण या खेळपट्टीवर चेंडू उसळायला हवेत, अशी मागणी कोहलीने बीसीसीआयकडे केली आहे. जर खेळपट्टीचा पोत बदलला गेला तर चेंडू उंच-सखल राहू शकतो. त्यामुळे सामना रद्द करण्याची वेळही येऊ शकते. पण या गोष्टीची बीसीसीआयने पर्वा केलेली नाही. बीसीसीआयने दोन क्युरेटर राजकोटला पाठवले आहेत. पण सौराष्ट्र क्रिकेट संघटनेने मात्र बीसीसीआयला चांगलेच सुनावले आहे. जर खेळपट्टीबाबत काही प्रश्न उपस्थित झाले तर बीसीसीआयने सर्व जबाबदारी घ्यावी, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.