Rohit Sharma BCCI : वर्ल्ड कप 2023 मधील भारतीय संघाच्या पराभवामुळे सारेच हळहळले. यानंतर आता पुढे काय असा विचार सुरू असताना, बीसीसीआयचे पदाधिकारी लवकरच कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांच्यासोबत बसून नव्याने विचार करण्यास सज्ज झाले आहेत. पुढील चार वर्षात तिन्ही फॉरमॅटसाठी रोहितचा नक्की प्लॅन काय, BCCI च्या अपेक्षा काय, याबाबत लवकरच चर्चा होणार असल्याची माहिती आहे. सूत्रांच्या मते, चर्चेचा मुख्य मुद्दा भविष्यासाठी कर्णधार तयार करणे तसेच रोहितच्या व्हाईट-बॉल क्रिकेट म्हणजेच वन डे आणि टी२० क्रिकेटच्या भविष्याबद्दल स्पष्टता मिळवणे हा असेल.
रोहित शर्माने याआधीच निवडकर्त्यांना सांगितले आहे की, टी२० साठी त्याच्या नावाचा विचार न करण्याबद्दल त्याला आक्षेप नाही. निवडकर्त्यांनी तरुण खेळाडूंना तयार केल्यामुळे, रोहित त्याच्या वनडे कारकिर्दीकडे कसा पाहतो हे पाहणे जास्त औत्सुक्याचे असेल. २०२७ मध्ये दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या पुढील एकदिवसीय विश्वचषकापर्यंत रोहितचे वय जवळपास ४० असेल. पुढील मोठी एकदिवसीय स्पर्धा म्हणजे २०२५ मध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी खेळवली जाईल. ती पाकिस्तानमध्ये खेळली जाईल. भारताला पुढील एका वर्षात फक्त सहा एकदिवसीय सामने खेळायचे आहेत.
बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की, विश्वचषकापूर्वी रोहितने सांगितले होते की, जर त्याच्या नावाचा टी२० साठी विचार केला गेला नाही तर त्याला काही हरकत नाही. निवडकर्ते गेल्या एक वर्षापासून टी२० मध्ये नव्या दमाच्या खेळाडूंना संधी देत आहेत. त्यामुळे रोहितचे वन डे क्रिकेटमध्ये खेळण्याबाबत नक्की काय प्लॅनिंग आहे, यासाठी बीसीसीआय त्याच्याशी चर्चा करणार आहे. सूत्राने दावा केला आहे की, सध्या असे दिसते आहे की वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपर्यंत रोहित आपली बरीच ऊर्जा कसोटी फॉरमॅटवर केंद्रित करेल. कसोटी क्रिकेटसाठी नवा कर्णधार तयार करण्याचा प्रयत्न त्याच्यासाठी महत्त्वाचा भाग असेल. हार्दिक पांड्याला दुखापत होण्याची शक्यता लक्षात घेऊन निवडकर्ते वनडे मध्येही वेगळा पर्याय शोधू शकतात.