नवी दिल्ली : भारतीय संघ सध्या बांगलादेशमध्ये असून तिथे वन डे मालिका खेळवली जात आहे. मात्र मालिकेतील पहिले दोन सामने गमावलेल्या रोहित सेनेने पुन्हा एकदा बांगलादेशच्या धरतीवर मालिका गमावली. लाजिरवाण्या पराभवानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आढावा बैठक घेणार आहे. संघ बांगलादेश दौर्यावरून परतल्यानंतर बीसीसीआयचे पदाधिकारी प्रशिक्षक राहुल द्रविड, एनसीए प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण, रोहित आणि माजी कर्णधार विराट कोहली यांची भेट घेतील.
दरम्यान, ट्वेंटी-20विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत इंग्लंडकडून भारताचा पराभव झाल्यानंतर BCCI आढावा बैठक घेणार होती. पण BCCI चे काही अधिकारी व्यस्त असल्यामुळे ती बैठक पुढे ढकलण्यात आली. पण क्रमवारीत सातव्या क्रमांकावर असलेल्या बांगलादेशकडून झालेल्या दोन पराभवांमुळे बीसीसीआयचे अधिकारी भारतात एका वर्षापेक्षा कमी कालावधीत होणाऱ्या 50 षटकांच्या विश्वचषकामुळे चिंतेत आहेत. BCCI लागली कामाला खरं तर भारतीय संघाने 2013 पासून एकही आयसीसीचा मोठा किताब जिंकला नाही. या पार्श्वभूमीवर बीसीसीआय कामाला लागली असून विश्वचषकाच्या तयारीवर भर देत आहे. "आम्ही बांगलादेशला जाण्यापूर्वी भारतीय संघाला भेटू शकलो नाही कारण काही पदाधिकारी व्यस्त होते, पण संघ बांगलादेशातून परत आल्यावर आम्ही त्यांची एक बैठक घेऊ. बांगलादेशकडून असा लाजीरवाणा पराभव होईल, अशी अपेक्षा नव्हती", असे बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
भारतीय संघात होणार बदल? हार्दिक पांड्या ट्वेंटी-20 संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारण्याची शक्यता आहे. त्यामुळे बीसीसीआय वन डे कर्णधार रोहित शर्माला कोणत्या भूमिकेत पाहते हे पाहण्याजोगे असेल. रोहितच्या नेतृत्वात भारतीय संघाने ट्वेंटी-20 विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठली होती. मात्र संघाला इंग्लंडकडून 10 गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला. आगामी वन डे विश्वचषक भारतात होणार आहे, त्यासाठी भारतीय संघात बदल होण्याची शक्यता आहे. मात्र चेतन शर्मा, सुनील जोशी, देबाशीष मोहंती आणि हरविंदर सिंग यांना पायउतार केल्यांनतर बीसीसीआयने अद्याप नवीन निवड समितीची नियुक्ती केलेली नाही.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"