मागच्या वर्षी झालेल्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर विराट कोहलीने ( Virat Kohli) तीनही फॉरमॅटच्या संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वीच त्याने ट्वेंटी-२० संघाचे नेतृत्व सोडत असल्याचे सांगितले होते. त्यानंतर बीसीसीआयने त्याच्याकडून वन डे संघाचेही नेतृत्व काढून घेतले आणि रोहित शर्माकडे ही जबाबदारी दिली. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरील तीन कसोटी सामन्यांची मालिका संपल्यानंतर विराटने कसोटीचेही नेतृत्व सोडत असल्याचे जाहीर केले.
विराटने जेव्हा तीनही फॉरमॅटच्या कर्णधारपदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केल, तेव्हा BCCI व त्याच्यात वाद असल्याच्या चर्चा रंगल्या. विराटच्या या निर्णयाला विराट कोहली vs सौरव गांगुली असे रूप देण्यात आले. पण, याबाबत आता मोठा खुलासा झाला आहे. बीसीसीआयचे खजिनदार अरुण सिंग धुमाल यांनी एका मुलाखतीत याबाबत खरं काय ते सांगितले. कर्णधारपद सोडण्याचा निर्णय हा सर्वस्वी विराट कोहलीचाच होता, असे धुमाल यांनी स्पष्ट केले.
''कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयाच म्हणत असाल तर तो त्याचाच निर्णय होता. मुझे अब नही करनी है कॅप्टनी!, त्याने हे ठरवले होते. त्याने हा निर्णय वर्ल्ड कपनंतर घ्यावा असे काहींना वाटत होते, परंतु तो त्यांचा दृष्टीकोन होता. विराटला कर्णधारपद सोडायचेच होते आणि तो त्याचाच निर्णय होता,''असे धुमाल यांनी सांगितले.
''विराट हा साधारण खेळाडू नाही. तो भारताचा स्टार खेळाडू आहे आणि त्याचे योगदान अतुल्य आहे. त्यामुळे त्याची संघात निवड होणार नाही, अशा चर्चा सुरूच असतात. त्याचा फार काही फरक पडत नाही. त्याचा फॉर्म परत यावा असे आम्हालाही वाटतेय,''असेही त्यांनी स्पष्ट केले.