मुंबई : विश्वचषकात पाकिस्तानबरोबर खेळावेच लागेल, अशी आयसीसीने भूमिका घेत बीसीसीआयची विनंती नाकारली होती. पण यानंतर बीसीसीआय मात्र शांत बसलेली नाही. आता विश्वचषकाला काही महिन्यांचा अवधी असला तरी आतापासून पाकिस्तानवर कशी बंदी आणता येईल, यासाठी बीसीसीआयने कंबर कसली आहे.
बीसीसीआयची गुरुवारी एक बैठक झाली. या बैठकीमध्ये विश्वचषकामध्ये पाकिस्तानवर कशी बंदी घालता येऊ शकते, यावर चर्चा करण्यात आली. याबाबत सरकारचा पाठिंबा कसा मिळतो आणि पुढे काय पावलं उचलायला हवीत, याबाबत चर्चा झाली.
याबाबत बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांनी सांगितले की, " विश्वचषकाला अजूनही चार महिन्यांच्या अवधी आहे. त्यामुळे आमच्याकडे अजून बराच कालावधी आहे. पण जेव्हा वेळ येईल तेव्हा काय करायचे, हे आम्ही ठरवत आहोत. या प्रकरणाच्या प्रक्रीयेला सुरुवात झाली आहे. सध्याच्या घडीला ती संथ गतीने सुरु आहे. काही देशांवर बंदी कशी आणता येऊ शकते, याबाबत आम्ही संयुक्त राष्ट्राचे दार ठोठावणार आहोत. त्याबाबतची प्रक्रीया आम्ही सुरु केली आहे."
भारताला पाकबरोबर खेळावेच लागेल- आयसीसी
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या देशांसोबत संबंध संपुष्टात आणण्याची बीसीसीआयची विनंती फेटाळताना अशा प्रकरणात आयसीसीची कुठलीच भूमिका नसल्याचे स्पष्ट केले. पुलवामा दहशतवादी हल्ल्यामध्ये सीआरपीएफच्या ४० सैनिकांच्या मृत्यूनंतर बीसीसीआयने आयसीसीला पत्र लिहिताना विश्व संस्था आणि त्यांच्यासोबत संलग्न असलेल्या देशांना दहशतवाद्यांना शरण देणाऱ्या देशांसोबत संबंध तोडण्याचे आवाहन केले होते.
आयसीसी चेअरमनने स्पष्ट केले की, कुठल्याही देशाला बहिष्कृत करण्याचा निर्णय सरकारच्या पातळीवर व्हायला हवा आणि आयसीसीमध्ये असा कुठलाही नियम नाही. बीसीसीआयलाही याची कल्पना होती, पण तरी त्यांनी प्रयत्न केला.’ बीसीसीआयने दहशतवाद्यांना शरण देण्याचा आरोप केलेल्या पत्रामध्ये पाकिस्तानचा कुठही उल्लेख नव्हता. हा मुद्दा शनिवारी चेअरमन शशांक मनोहर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आयसीसी बोर्डाच्या बैठकीमध्ये उपस्थित करण्यात आला, पण त्यावर फार वेळ चर्चा झाली नाही. बैठकीमध्ये बीसीसीआयचे प्रतिनिधित्व कार्यवाहक सचिव अमिताभ चौधरी करीत होते. बोर्डाचे अधिकारी म्हणाले, ‘सदस्य देशांतील अनेक खेळाडू पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळतात आणि ते अशा प्रकारच्या विनंतीला अधिक महत्त्व देत नाही. सुरक्षा हा चिंतेचा विषय असून, त्याला पूर्ण महत्त्व देण्यात आले.
कधी आहे सामना?
भारतीय क्रिकेट संघाला आगामी विश्वकप स्पर्धेदरम्यान १६ जून रोजी पाकिस्तानविरुद्ध खेळायचे आहे. पुलवामा हल्ल्यानंतर उभय देशांदरम्यानच्या या लढतीवर बहिष्कार टाकण्याची मागणी करण्यात येत आहे. भारतीय क्रिकेटचे संचालन करीत असलेल्या प्रशासकांच्या समितीने अद्याप याबाबत कुठला निर्णय घेतलेला नसून सरकारचे काय मत आहे, याची प्रतीक्षा करीत आहेत.
Web Title: BCCI trying hard to ban Pakistan in world cup 2019
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.