भारतीय संघातील मध्यफळीतील फलंदाज श्रेयस अय्यर याचे टीम इंडियाच्या कसोटी संघातील दरवाजे बंद झाल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. दुलिप करंडक स्पर्धेत स्वत:ला सिद्ध करून टीम इंडियात एन्ट्री मारण्याची संधी त्याने गमावलीये. देशांतर्गत क्रिकेटमधील लोकप्रिय आणि टीम इंडियात पुन्हा कमबॅकसाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या दुलिप करंड स्पर्धेत भारत 'ड' संघाचे नेतृत्व करताना श्रेयस अय्यर आपलं कर्तृत्व दाखवण्यात अपयशी ठरला. या स्पर्धेतील ४ डावात त्याला फक्त १०४ धावांच करता आल्या. यात एकदा त्याच्या वाट्याला भोपळाही आला.
बांगलादेश विरुद्धची संधी हुकलीच, त्याचा याच्या पुढचा प्रवासही अवघड
श्रेयस अय्यरच्या या ढिसाळ कामगिरीमुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) त्याच्यावर नाखूश आहे. त्यामुळे भविष्यात भारतीय कसोटी संघात स्थान मिळवण्याचा त्याचा मार्ग खडतर झाला आहे. बांगलादेश विरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटीसाठी त्याला संधी मिळालेली नाही. दुसऱ्या सामन्यातही त्याचा विचार होईल, असे वाटत नाही. त्यानंतरही मायदेशात होणाऱ्या न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसह ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरही तो टीम इंडियात दिसेल, असे वाटत नाही. एका बीसीसीआय अधिकाऱ्यानेच यासंदर्भात संकेत दिले आहेत.
सेट असताना चुकीचा फटका खेळणं पडणार महागात
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने टेलीग्राफला दिलेल्या माहितीनुसार,, "सध्याच्या घडीला श्रेयस अय्यरसाठी भारतीय कसोटी संघात जागा नाही. तो कुणाची जागा घेईल? दुलिप करंडक स्पर्धेतील त्याचे शॉट सिलेक्शन हा एक चिंतेचा विषय आहे. दुलिप करंडक स्पर्धेतील अखेरच्या सामन्यात तो लयीत दिसत होता. पण अचानक खराब शॉट खेळून तो बाद झाला. ज्यावेळी तुम्ही सेट असता आणि सपाट खेळपट्टीवर खेळत असता त्यावेळी संधीच सोनं करण्यासाठी ती सर्वोत्तम वेळ असते." अय्यरला ते जमलं नाही असं म्हणत संबंधित अधिकाऱ्याने त्याला भारतीय संघात स्थान मिळणं कठीण झाल्याचे स्पष्ट होते.
उसळत्या चेंडूवरील संघर्षामुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यातूनही पत्ता होईल कट
दुसऱ्या एका बीसीसीआय अधिकाऱ्याने श्रेयस अय्यरला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरही टीम इंडियात संधी मिळणार नसल्याचे म्हटले आहे. भारतीय संघ २२ नोव्हेंबरपासून ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. दुलिप करंडक स्पर्धेनंतर श्रेयस देशांतर्गत क्रिकेटमधील ईरानी चषक स्पर्धेत कामगिरी करून दाखवण्यात अपयशी ठरला तर त्याला रणजी करंडक स्पर्धेत स्वत:ला सिद्ध करावे लागेल, असेही या अधिकाऱ्याने बोलून दाखवले. दुलिप करंडक स्पर्धेत आणखी एक राउंड बाकी आहे. यात त्याच्या भात्यातून शतकही येऊ शकते. पण शॉर्ट बॉलला तो चाचपडत असल्यामुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याचा विचार होईल, असे वाटत नाही, या गोष्टीवरही बीसीसीआय अधिकाऱ्याने जोर दिला.