नवी दिल्ली : कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता बीसीसीआयने यंदा आयपीएलचे १३ वे पर्व यूएईमध्ये आयोजित केले आहे. १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. २०२१ साली होणाऱ्या १४ व्या पर्वासाठी मात्र बीसीसीआयने खेळाडूंचा लिलाव स्थगित करण्याचे ठरवले शिवाय २०२० च्या हंगामाचा लिलाव छोटेखानी स्वरूपात पार पडला होता. तेरावे पर्व आटोपल्यानंतर १४ व्या पर्वासाठी मिळणारा कमी वेळ राहणार असल्याने बीसीसीआय पुढील हंगामाचा लिलाव स्थगित करू शकते.
आयपीएलच्या १४ व्या पर्वात सर्व संघमालकांना याच खेळाडूंनिशी मैदानात यावे लागेल. अखेरच्या क्षणी एखाद्या खेळाडूने माघार घेतली किंवा दुखापतीचे प्रसंग झाल्यास खेळाडू अदलाबदल करण्याची परवानगी मिळेल. १० नोव्हेंबरला तेरावे पर्व संपल्यानंतर पुढील आयपीएलच्या तयारीसाठी बीसीसीआयला फक्त चार महिन्यांचा कालावधी मिळणार आहे. ६० सामन्यांचे आयोजन, वेळापत्रक, सरकारी परवानग्या यासाठी बराच वेळ खर्च होणार आहे. यासाठीच बीसीसीआयने खेळाडूंचा लिलाव स्थगित करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. बहुतांश संघमालकांचा बीसीसीआयच्या या निर्णयाला पाठिंबा असल्याची माहिती आहे. २०२१ च्या आयपीएलनंतर भारतीय संघाने श्रीलंकेत मालिका खेळणे अपेक्षित आहे. यानंतर भारतीय संघाला आशिया चषकातही सहभागी व्हायचे आहे. आंतरराष्ट्रीय व्यस्त वेळापत्रक व इतर बाबी लक्षात घेता बीसीसीआयने पुढील वर्षासाठी खेळाडूंचा लिलाव स्थगित करण्याचे ठरवले आहे. (वृत्तसंस्था)
पतंजली प्रायोजकाच्या शर्यतीत
आयपीएलच्या १३ व्या पर्वासाठी विवो मुख्य प्रायोजक असणार नाही, हे स्पष्ट होताच बीसीसीआय नवीन प्रायोजक शोधण्याच्या तयारीत आहे. जियो, बायजू, अॅमेझॉन आणि कोकाकोला पाठोपाठ योगगुरू बाबा रामदेव यांचा पतंजली हा ब्रँडही आयपीएल स्पॉन्सरशिपच्या शर्यतीत उतरण्याच्या तयारीत आहे.
पतंजली’ हा ब्रँड जागतिक पातळीवर पोहचावा यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी आयपीएलच्या १३ व्या पर्वाला स्पॉन्सरशिप देता येईल का यासाठी आमचे प्रयत्न सुरूआहेत,’ अशी माहिती पतंजली उद्योगसमूहाचे प्रवक्ते एस.के. तिजारावाला यांनी दिली. यासाठी पतंजली लवकरच आपली निविदा दाखल करणार असल्याचे समजते.
विवोसोबतचा करार स्थगित झाला याचा अर्थ बीसीसीआयवर कोणतेही आर्थिक संकट आलेले नाही. विवोसोबतचा करार स्थगित करणे परिस्थिती पाहून घेतलेला निर्णय आहे. बीसीसीआय प्रत्येकवेळी दुसरा पर्याय तयार ठेवते. आतापर्यंत सर्व खेळाडू, राज्य संघटना आणि अधिकारी यांच्या सहकार्याने बीसीसीआयचे कामकाज उत्तम चालले आहे,’ असे बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी एका कार्यक्रमात बोलताना सांगितले.
Web Title: BCCI unlikely to host IPL mega auction for 2021 season
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.