Join us  

हार्दिक पांड्याची लय काळजी! BCCI ने तयार केला खास १८ आठवड्यांचा हाय परफॉर्मन्स प्रोग्राम

हार्दिक पांड्या ( Hardik Pandya) दुखापतीतून सावरुन पुन्हा फॉर्मात आला होता, तोच त्याला वर्ल्ड कप स्पर्धेत दुखापत झाली.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2023 12:55 PM

Open in App

दुखापत, ही भारतीय क्रिकेट संघाच्या राशीला पुजलेली आहे. आज हा जखमी, तर उद्या दुसरा खेळाडू जखमी... हार्दिक पांड्या ( Hardik Pandya) दुखापतीतून सावरुन पुन्हा फॉर्मात आला होता, तोच त्याला वर्ल्ड कप स्पर्धेत दुखापत झाली. त्याला वन वर्ल्ड कपमधून माघार घ्यावी लागलीच, शिवाय ऑस्ट्रेलियाविरुद्धची ट्वेंटी-२० मालिका, दक्षिण आफ्रिका दौरा आदींनाही तो मुकला आहे. अशात त्याच्या पुनरागमनाची सर्वांनाच आतुरतेनं प्रतीक्षा आहे. वर्ल्ड कपमध्ये बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात पाय मुरगळण्याचं निमित्त झालं अन् हार्दिकला स्पर्धेबाहेर व्हावं लागलं.  

बीसीसीआय आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीने ( NCA) यांनी दीर्घ कालीन विचार करता हार्दिकसाठी १८ आठवड्यांचा विशेष हाय परफॉर्मन्स प्रोग्राम तयार केला आहे. पुढल्या वर्षी होणारा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप आणि २०२६ वर्ल्ड कप डोळ्यासमोर ठेवून हार्दिक हा संघासाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे त्याला द्विदेशीय मालिकेत खेळवण्याची घाई बीसीसीआय करणार नाही. हार्दिकसाठी १८ आठवड्यांसाठीचा दैनंदिन कार्यक्रम NCAने तयार केला आहे. त्यामध्ये कार्डिओ, स्ट्रेंथ ट्रेनिंग, फंक्शनल ट्रेनिंग आणि महत्त्वाचे म्हणजे पुरेशी विश्रांती आणि पुनर्प्राप्ती यासह फिटनेसच्या विविध पैलूंचा विस्तार केला गेला आहे. पुढील आव्हानांसाठी हार्दिकला तयार करायचे, हे ध्येय स्पष्ट आहे.

 बीसीसीआय आणि एनसीएने घेतलेला दृष्टिकोन अभूतपूर्व नाही. जसप्रीत बुमराह, श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांसारख्या खेळाडूंसाठी यापूर्वी दुखापतीच्या वेळी वैयक्तिक कार्यक्रम आखले गेले आहेत. खेळण्याची परिस्थिती, कौशल्याची आवश्यकता आणि आगामी असाइनमेंट यासारख्या घटकांचा विचार करून, प्रत्येक दिनचर्या खेळाडूच्या विशिष्ट गरजांनुसार तयार केली जाते. सूत्रांनी सांगितले की, हार्दिकला सध्याची दुखापत त्याच्या मागील पाठीच्या दुखापतीशी संबंधित नाही, ज्यासाठी २०१९ मध्ये शस्त्रक्रिया आवश्यक होती. 

३० वर्षीय खेळाडूने पुनरागमन केल्यापासून उत्कृष्ट तंदुरुस्ती राखली आहे, आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सचे नेतृत्व केले आहे आणि  पहिल्याच प्रयत्नात जेतेपद पटकावून दिले. २०२३ मध्ये हार्दिकने श्रीलंका, न्यूझीलंड आणि वेस्ट इंडीज विरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत संघाचे नेतृत्व केले आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या आगामी ट्वेंटी-२० मालिकेतही त्याचे खेळणे निश्चित नाही. त्यावेळी तंदुरुस्ती पाहून निर्णय घेतला जाईल. जून २०२२ नंतर भारतीय संघाने ५५ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० सामने खेळले आणि हार्दिक त्यापैकी ३८ सामन्यांत होता. वन डे क्रिकेटमध्ये या कालावधीत ५० पैकी २३ सामने तो खेळला.   

टॅग्स :हार्दिक पांड्याबीसीसीआय