ठळक मुद्देटीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीला बीसीसीआयने फर्मान बजावलं आहे. विराट कोहलीला ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड अर्थातच ओएनजीसीचं मॅनेजरपद सोडण्याचे आदेश बीसीसीआयने दिले आहेत.ओएनजीसीमध्ये विराट मॅनेजर पदावर कार्यरत आहे. तेच पद सोडण्याचं बीसीसीआयकडून विराटला सांगण्यात आलं आहे.
मुंबई, दि. 29- टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीच्या खेळाची नेहमीच सगळीकडे चर्चा असते. कोहलीच्या मैदानावरील धमाकेदार खेळाने त्याला प्रसिद्धी मिळवून दिली तसंच अनेक बक्षीस आणि सरकारी नोकरीही मिळवून दिली. टीम इंडियासाठी विराटने केलेल्या कामगिरीमुळे त्याला सरकारकडून ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड अर्थातच ओएनजीसीमध्ये नोकरी देण्यात आली. पण आता तिच नोकरी विराटला सोडावी लागणार आहे. टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीला बीसीसीआयने फर्मान बजावलं आहे. विराट कोहलीला ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड अर्थातच ओएनजीसीचं मॅनेजरपद सोडण्याचे आदेश बीसीसीआयने दिले आहेत. ‘कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट’च्या मुद्द्यावरुन यापूर्वी सुनील गावस्कर, राहुल द्रविड आणि सौरव गांगुली या खेळाडूंना अडचणीचा सामना करावा लागला होता. त्यानंतर आता विराट कोहलीला नोकरी सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ओएनजीसीमध्ये विराट मॅनेजर पदावर कार्यरत आहे. तेच पद सोडण्याचं बीसीसीआयकडून विराटला सांगण्यात आलं आहे.
सरकारी किंवा खासगी कंपन्यांशी करारबद्ध असलेल्या क्रिकेटर्सना त्यांची नोकरी सोडायला सांगा, असा सल्ला सुप्रीम कोर्टाने बीसीसीआयला दिला होता. त्यानुसार क्रिकेट प्रशासक समितीने, कोणताही क्रिकेटर सरकारी किंवा खासगी कंपनीमध्ये काम करणार नाही, असं बोर्डाला स्पष्ट शब्दात सांगितलं. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयानुसारच आता विराटला ओएनजीसीतील त्याची नोकरी सोडावी लागणार आहे. कोहलीने स्थानिक क्रिकेट मॅचमध्ये ओएनजीसीचं प्रतिनिधित्व केलं होतं. त्यामुळे त्याची वर्णी ओएनजीसीच्या मॅनेजरपदी लागली होती. पण आता ती कंपनी विराटला सोडावी लागणार आहे. बीसीसीआयच्या या फर्मानाचा परिणाम गौतम गंभीर, विरेंद्र सेहवाग, इशांत शर्मा या दिल्लीतील खेळाडूंवर जास्त होणार आहे. याच कारण म्हणजे टीम इंडियासाठी खेळताना इतर खासगी कंपन्यांमधील नोकरीतून जास्त कमाई होते. कॅप्टन कोहलीशिवाय अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा यांच्यासह इतर खेळाडूंनाही बीसीसीआयने नोकरी सोडण्याचे आदेश दिले आहेत.
एका बीसीसीआय अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढच्या स्पेशल जनरल मीटिंगमध्ये या मुद्द्यावर विचार केला जाणार आहे. फक्त खेळाडूंच्या बाबतीत नाही तर इतरही मुद्द्यांवरून ‘कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट’चा मुद्दा समोर येऊ शकतो. म्हणून या सगळ्याच मुद्द्यावर बीसीसीआयच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. कुठलाही क्रिकेटर सरकारी किंवा खासगी कंपनीमध्ये काम करणार नाही, या सुप्रमी कोर्टाच्या निर्णयाचा खेळाडूंवर सगळ्यात जास्त परिणाम होइल.
Web Title: BCCI Urges Kohli to Resign
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.