BCCI on Virat Kohli Test captaicy decision : मागच्या वर्षी झालेल्या इंग्लंड दौऱ्यानंतर भारतीय क्रिकेट वर्तुळात काहीतरी शिजत असल्याची चुणूक लागली होती. त्या दौऱ्यावरील जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील पराभवानंतर संघातील वातावरण बदलल्याचे म्हटले गेले. मागील पाच महिन्यांत विराटनं त्याच्या चाहत्यांना धक्क्यांमागून धक्के दिले आहेत. इंडियन प्रीमिअर लीगमधील संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे कर्णधारपद, त्यानंतर भारताच्या ट्वेंटी-२० संघाचे कर्णधारपद त्याने सोडले. त्यानंतर वन डे संघाच्या कर्णधारपदावरून त्याला हटवण्यात आले आणि आज त्यानं कसोटी संघाचे कर्णधारपदही सोडले.
विराटच्या ट्वेंटी-२० कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयावरून बरंच रामायण झालं. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली म्हणाला आम्ही त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, तर विराट म्हणतो माझ्याशी कुणी बोललंच नाही. मी निर्णय सांगितला आणि त्यांनी गप्प ऐकून त्याचा स्वीकार केला. यात खरं कोण खोटं कोण हे व्हायचं बाकी आहे. त्यात आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पराभवानंतर विराटनं कसोटी संघाचे कर्णधारपदही सोडलं. भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून विराट अव्वल स्थानी आहे. आता त्याच्या या निर्णयावर बीसीसीआयकडून प्रतिक्रिया आली आहे.
बीसीसीआयचे खजिनदार अरुण धुमाळ यांनी ANIला सांगितले की,'' बीसीसीआय किंवा निवड समितीकडून विराटवर कर्णधारपद सोडण्यासाठी कोणताच दबाव नव्हता. हा सर्वस्वी त्याचा निर्णय आहे आणि आम्ही त्याचा आदर करतो. त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. परंतु आणखी दोन-तीन वर्ष त्यानं कर्णधारपदावर रहायला हवं होतं.''
ते पुढे म्हणाले, ''विराट हा भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार आहे, यात तीळमात्र शंका नाही. त्याच्या नेतृत्व कौशल्याखाली, मार्गदर्शनाखाली आणि फलंदाजीच्या कौशल्याच्या जोरावर भारतीय संघ पुढेही दमदार कामगिरी करेल, याची मला खात्री आहे. दक्षिण आफ्रिकेतील मालिका पराभव हा त्याच्या निर्णयामागील कारण असेल, असं मला वाटत नाही. तो कदाचीत येथे कसोटी मालिका जिंकणारा पहिला कर्णधारही बनला असला. आता ही नेतृत्वाची जबाबदारी दुसऱ्याकडे जावी, असा त्याचा विचार असेल. तो ७ वर्ष संघाच्या कर्णधारपदावर आहे.''