BCCI vs PCB : India vs Pakistan हा वाद सुरूच राहणार आहे. आशिया चषक २०२३ स्पर्धेसाठी बीसीसीआयने भारतीय संघाला पाकिस्तानात न पाठवण्याचा ठाम पवित्रा घेतला. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड ( PCB) ने नमतं घेत हायब्रिड मॉडेलमध्ये आशिया चषक स्पर्धा खेळवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार भारताचे सामने श्रीलंकेत होण्यावर सहमती झाली. आशिया चषक २०२३ स्पर्धेचा तिढा सुटला असे वाटत असताना पाकिस्तान पुन्हा रडायला लागले आहेत. आयसीसीची २०२५ चॅम्पियन्स ट्रॉफीही पाकिस्तानात होणार आहे आणि त्याचे यजमानपद न भूषविण्याची धमकी आता PCBकडू दिली जातेय.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ पाकिस्तानात न आल्यास होणाऱ्या आर्थिक नुकसानाची हमी त्यांना ICC कडून हवी आहे. भारत सरकारच्या परवानगीशिवाय संघाला न पाठवण्यावर बीसीसीआय ठाम आहे. त्यामुळे २०२५ मध्येही टीम इंडिया जाण्याची शक्यता नाहीच आहेत. त्यामुळे PCB आतापासून आयसीसीवर दबाव टाकण्यास सुरूवात करू लागले आहेत. आयसीसीचे चेअरमन ग्रेग बार्क्ले आणि सीईओ जॉफ अलार्डिस यांनी मागील महिन्यात यजमानपदाच्या करारासाठी पाकिस्तान दौरा केला, परंतु PCB ने त्यावर स्वाक्षरी करण्यास मनाई केली.
भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी एकतर पाकिस्तानात येण्याची हमी द्यावी किंवा आयसीसीने होणाऱ्या नुकसानाची आर्थिक हमी द्यावी अशी मागणी PCB ने केली आहे. आशिया चषक २०२३ प्रमाणे चॅम्पियन्स ट्रॉफीही ( २०२५) हायब्रिड मॉडेलनुसार खेळवाली लागेल, ही भीती पाकिस्तानला सतावत आहे. आशिया चषकाचेही यजमानपद पाकिस्तानकडे आहे, परंतु BCCI च्या विरोधामुळे त्यांना केवळ चार सामन्यांचे यजमानपद मिळाले आहे, तर ९ सामने श्रीलंकेत खेळवले जाणार आहेत.