BCCI vs Virat Kohli: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पराभवानंतर विराट कोहलीनं ( Virat Kohli) २४ तासांच्या आत कसोटी संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय जाहीर केला. विराट कोहलीचा हा निर्णय सर्वांना धक्का देणारा होता. ट्वेंटी-२० वर्ल्ड कपआधी त्यानं स्पर्धेनंतर ट्वेंटी-२० संघाच्या कर्णधारपदावर कायम राहणार नसल्याचे सांगितले होते. त्यानंतर बीसीसीआयनं दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी वन डे कर्णधारपदावरून विराटची उचलबांगडी केली. विराट आणि बीसीसीआय यांच्यातला वाद इथेच समोर आला. त्यात आता बीसीसीआयच्या सूत्रांनी InsideSport.IN ला दिलेल्या माहितीत मोठा गौप्यस्फोट झाला आहे.
BCCI vs Virat Kohli ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या तोंडावर विराटनं या स्पर्धेनंतर संघाचे नेतृत्व करणार नसल्याचे जाहीर करून पहिला धक्का दिला. त्यानंतर दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी त्यानं फटाके फोडले. ट्वेंटी-२० संघाचे कर्णधारपद सोडताना बीसीसीआयकडून कुणीच समजावले नाही, असा दावा केला. जो बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांच्या दाव्याच्या परस्पर विरुद्ध होता. गांगुलीनं मी स्वतः विराटला समजावण्याचा प्रयत्न केल्याचे विधान केले होते. त्याच दिवशी बीसीसीआयनं रोहित शर्माची वन डे संघाचा कर्णधार म्हणून घोषणा केली.
याही निर्णयाबाबत ९० मिनिटांच्या बैठकीच्या अखेरीस सांगितल्याचा गौप्यस्फोट विराटनं केला. त्यानंतर बीसीसीआयकडून अनेक बचावात्मक स्टेटमेंट आल्या. पण, नेमकं खरं कोण बोलतंय हेच अजूनही कळलेले नाही. निवड समिती प्रमुख चेतन शर्मा यांनीही पत्रकार परिषदेत विराटचा दावा खोडण्याचा प्रयत्न केला.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर बीसीसीआय स्वतःच विराटला कर्णधारपदावरून काढण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. आफ्रिका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी विराटनं पत्रकार परिषदेतून बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीला थेट अंगावर घेतले होते. त्यानंतर गांगुली अॅक्शन मोडमध्ये होता. त्यात आता ही बातमी समोर येत आहे. ''दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर त्याला कर्णधारपदावरून हटवण्याचा मुद्दा चर्चेत आला. यावर सर्व सहमत नव्हते, परंतु बहुतेक जण स्प्लिट कॅप्टन्सीच्या विरोधात होते आणि सर्वांना नव्यानं सुरुवात करायची होती. विराट कोहलीला फलंदाजीवर लक्ष केंद्रीत करायचे आहे. जर त्यानं स्वतः कसोटी संघाचे कर्णधारपद सोडले नसते तर त्याला तसे करायला सांगण्यात आले असते,''असे बीसीसीआय सूत्रांनी InsideSport.IN ला सांगितले.