Hardik Pandya Injury ( Marathi News ) आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप डोळ्यासमोर ठेऊन बीसीसीआय व संघ व्यवस्थापन कामाला लागले आहेत... रोहित शर्मा व विराट कोहली यांचे १४ महिन्यानंतर ट्वेंटी-२० संघात पुनरागमन हे त्या दृष्टीने टाकलेले सकारात्मक पाऊल आहे. २०२२च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कपनंतर रोहित व विराट शॉर्ट फॉरमॅटपासून दूर आहेत आणि हार्दिक पांड्याच्या खांद्यावर नेतृत्वाची जबाबदारी सोपवली गेली. त्यामुळे जून २०२४ मध्ये होणाऱ्या वर्ल्ड कपमध्ये हार्दिकच ट्वेंटी-२० संघाचे नेतृत्व करेल अशी चर्चा होती, परंतु रोहितच्या एन्ट्रीने ती मावळली आहे. त्याचवेळी हार्दिकचा फिटनेस हा नेहमीच चर्चेत राहणारा विषय आहे. हिच गोष्ट लक्षात घेऊन BCCI ने बॅकअप प्लान तयार केला आहे.
मेहनतीचे फळ! यशस्वी जैस्वाल, शिवम दुबे यांना BCCI मोठं सप्राईज देण्याच्या तयारीत
वन डे वर्ल्ड कप २०२३ मध्ये बांगलादेशविरुद्धच्या लढतीत हार्दिकचा पाय मुरगळला आणि त्याला मैदान सोडावे लागले. त्यानंतर तो ऑस्ट्रेलियाविरुद्धची ट्वेंटी-२० मालिका, दक्षिण आफ्रिका दौरा आणि अफगाणिस्तानविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेला मुकला आहे. इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये मुंबई इंडियन्सचे नेतृत्व हार्दिककडे सोपवण्यात आले खरे, परंतु तो काही सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे. हार्दिकच्या या अनिश्चिततेमुळे बीसीसीआयने बॅकअप म्हणून शिवम दुबेकडे लक्ष वळवले आहे.
शिवमने तीन वर्षांनंतर भारताच्या ट्वेंटी-२० संघात पदार्पण केले. आयर्लंडविरुद्धच्या २०२३च्या मालिकेत त्याची निवड झाली होती. इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मधील दमदार कामगिरीमुळे त्याचे पुनरागमन झाले. त्याने आतापर्यंत २० आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त ४५.८३च्या सरासरीने २७५ धावा केल्या आहेत आणि ८ विकेट्सही घेतल्या आहेत.