एका स्टिंग ऑपरेशनमुळे अडचणीत आलेले भारतीय संघाच्या निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता भारतीय संघाच्या निवड समितीचे रिक्त झालेले अध्यक्षपद कोण सांभाळणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, सूत्रांकडून येत असलेल्या माहितीनुसार माजी किकेटपटू शिवसुंदर दास यांच्याकडे निवड समितीचे हंगामी अध्यक्षपद सोपवण्यात येऊ शकते. लवकरच त्याची औपचारिक घोषणा होऊ शकते.
झी न्यूज या वृत्तवाहिनीने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमुळे चेतन शर्मा हे वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. या स्टिंग ऑपरेशनमध्ये चेतन शर्मा यांनी अनेक स्फोटक विधाने केली होती. त्यामुळे भारतीय क्रिकेट आणि बीसीसीआयमध्ये खळबळ माजली होती. तसेच चेतन शर्मा यांच्यावर कारवाईचे संकेत देण्यात आले होते. मात्र आज चेतन शर्मा यांनी स्वत:च राजीनामा देत पदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला. बीसीसीआय सचिवांकडे त्यांनी राजीनामा पाठवला असून तो त्यांनी मान्य केला आहे.
भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांनी स्टींग ऑपरेशनमध्ये अनेक धक्कादायक विधानं केली होती. विद्यमान कर्णधार रोहित शर्मापासून ते विराट कोहलीला कर्णधार पदावरून हटवण्यापर्यंतच्या अनेक घटनांबाबत शर्मा यांनी वादग्रस्त वक्तव्ये केली होती. जसप्रीत बुमराहची दुखापत, हार्दिक पांड्याचे करिअर अशा वेगवेगळ्या गोष्टींवर त्यांनी केलेली वक्तव्ये ऐकून भारतीय क्रिकेटरसिकांच्या पायाखालची जमीन सरकली. हे स्टिंग डिसेंबर महिन्यात झालं, असं म्हटलं जात आहे. यावेळी चेतन निवड समिती प्रमुख नव्हते. पहिल्या टर्मनंतर त्यांची उचलबांगडी झाली होती. नंतर ९ जानेवारीला त्यांची या पदावर फेरनिवड झाली. मधल्या काळात त्यांनी बोर्ड आणि खेळाडूंबाबत इतक्या आतल्या गोष्टी का बरळल्या असाव्यात? याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.