सिडनी : क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे अंतरिम मुख्य कार्यकारी अधिकारी निक हॉकले यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आयपीएलमध्ये सहभागी झालेल्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंसाठी चार्टर्ड विमानाची व्यवस्था करीत असल्याचे बुधवारी सांगितले. भारतात कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाने प्रवासावर बंदी असल्यामुळे या खेळाडूंना मायदेशी परतण्याआधी मालदीव अथवा श्रीलंकेत थांबावे लागण्याची शक्यता आहे.हॉकले यांनी सिडनीत पत्रकारांशी बोलताना म्हटले, ‘सध्या बीसीसीआयचे लक्ष हे ऑस्ट्रेलियाच नव्हे तर सर्वच खेळाडूंना सुरक्षित घरी पोहोचण्यावर आहे. ते खेळाडूंसाठी अनेक पर्यायावर काम करीत आहेत. आता मालदीव व श्रीलंकेला निवडले आहे. बीसीसीआय त्यांना मायदेशी पाठवण्यासाठी कटिबद्ध आहे.’ कोलकाता नाईट रायडर्स, दिल्ली कॅपिटल्स, सनरायझर्स हैदराबाद व चेन्नई सुपर किंग्समध्ये कोरोना संक्रमणाची प्रकरणे समोर आल्यानंतर मंगळवारी आयपीएल अनिश्चित काळासाठी स्थगित झाली.
ऑस्ट्रेलिया सरकारने भारतातून परतणाऱ्यांसाठी कडक नियम लागू केल्याने प्रशिक्षक व समालोचकांसह ऑस्ट्रेलियाचे १४ खेळाडू आता दुसऱ्या मार्गाने मायदेशी परततील. कोरोनाबाधित सीएसकेचा फलंदाजी प्रशिक्षक माइक हसी भारतात १० दिवस विलगीकरणात राहणार आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेटर्स संघटनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी टॉड ग्रीनबर यांनी कोरोना संसर्गानंतरही हसीचे मनोधैर्य तुटले नसल्याचे सांगितले. त्याचवेळी केन विलियम्सनसह न्यूझीलंडचे खेळाडू १० मेपर्यंत भारतातच राहतील. त्यानंतर ते इंग्लंडला दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी रवाना होतील. २ जूनपासून इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळणारा न्यूझीलंड संघ १८ जूनपासून भारताविरुद्ध कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना खेळतील.
इंग्लंडचे खेळाडू परतलेइंग्लंडचे ११ पैकी आठ खेळाडू बुधवारी मायदेशी परतले. त्यात जोस बटलर आणि जॉनी बेअरस्टॉ यांचा समावेश आहे. सॅम कुरेन, टॉम कुरेन, सॅम बिलिंग्स, ख्रिस वोक्स, मोईन अली व जेसन रॉय हेही इंग्लंडमध्ये परतले आहेत. इंग्लंडचा मर्यादित षटकांचा कर्णधार इयॉन मॉर्गन, डेव्हिड मलान व ख्रिस जॉर्डन हे पुढील ४८ तासांत भारतातून परतण्याची शक्यता आहे. इंग्लंडने कोरोना महामारीमुळे भारताला ‘रेड लिस्ट’ ठेवले आहे आणि अशा परिस्थितीत क्रिकेटपटूंना १० दिवसांपर्यंत विलगीकरणात राहावे लागणार आहे.