नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट नियामंक मंडळाने 2008 साली सुरु केलेली इंडियन प्रीमियर लीग स्पर्धा आज बीसीसीआयच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत बनली आहे. बीसीसीआयच्या एकूण उत्पन्नापैकी तब्बल 95 टक्के उत्पन्न एकटया आयपीएलमधून मिळणार आहे. आगामी आर्थिक वर्षातील उत्पन्न आणि खर्चाचे बीसीसीआयने जे अंदाजपत्रक तयार केले आहे त्यानुसार आयपीएलमधून बीसीसीआयला 2,017 कोटी रुपयाचे अतिरिक्त उत्पन्न मिळणार आहे. अन्य आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेट सामने, करार यातून बीसीसीआयच्या तिजोरीत 125 कोटी जमा होणार आहेत.
वर्षाच्या 320 दिवसांमध्ये खेळल्या जाणा-या सामन्यांमधून जितका नफा होतो त्यापेक्षा 16 पट जास्त नफा फक्त आयपीएलच्या 45 दिवसांमधून मिळणार आहे. 3,413 कोटींच्या उत्पनापैकी 1,272 कोटी रुपये क्रिकेटचे इन्फ्रास्ट्राक्चर आणि अन्य आवश्यक खर्च केल्यानंतर दोन हजार कोटींपेक्षा जास्त उत्पन्न शिल्लक राहणार आहे.
चालू वर्षात बीसीसीआयच्या एकूण उत्पन्नात आयपीएलचा वाटा 60 टक्के म्हणजे 670 कोटी रुपये असेल. स्टार इंडियाबरोबर पाचवर्षांचा जो 16,347 कोटींचा प्रसारणाचा करार झाला आहे त्यामुळे पूर्ण चित्रच पालटणार आहे. आयपीएलमधून बीसीआयला 2017 कोटी रुपये मिळणार आहेत. मागच्या आर्थिक वर्षात 400 कोटी रुपये मिळाले होते. आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत सामन्यांमधून बीसीसायला 125 कोटी रुपये मिळणार आहेत.