काल झालेल्या टी २० वर्ल्ड कप फायनलमध्ये टीम इंडियाने गेलेला सामना साऊथ आफ्रिकेकडून खेचून आणला. चोकर्सनी सामन्याच्या सुरुवातीपासूनच खेळावर पकड मिळविलेली. परंतू, आयपीएलमध्ये लोकांच्या शिव्याशाप खाल्लेल्या हार्दिक पांड्याने भारताला वर्ल्डकप जिंकवून दिला. आफ्रिकेच्या दोन तगड्या खेळाडूंना आऊट करत पारडे भारताच्या बाजुने पटलवले. सुर्याने मिलरचा अप्रतिम झेल टिपला आणि करोडो लोकांनी सुटकेचा निश्वास सोडला. हा विजय एकट्या कोणाचा नव्हता तर सांघिक कामगिरीचा होता. बीसीसीआय आता या विजेत्या संघाला किती बक्षीसी जाहीर करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
२००७ मध्ये जेव्हा भारताने दक्षिण आफ्रिकेमध्ये टी २० वर्ल्ड कप जिंकला होता, तेव्हा बीसीसीआयने प्रत्येक खेळाडूला २-२ कोटी रुपये बक्षीस म्हणून दिले होते. तर २०११ मध्ये वर्ल्ड कप जिंकला तेव्हा १ कोटींची बक्षीसाची रक्कम दुपटीने वाढवून २ कोटी रुपये करण्यात आली होती.
यावेळी खेळाडूंनी बक्षीसाची रक्कम ५ कोटी करण्याची मागणी केल्याची चर्चा होती. यामुळे बीसीसीआयने १ कोटींवरून २ कोटी रक्कम केल्याचे म्हटले जात होते. बीसीसीआयने याचे खंडण केले होते. २८ वर्षांनी एक मोठी स्पर्धा जिंकल्याने ही रक्कम वाढविण्याची मागणी खेळाडू करत होते.
आता एवढ्या मोठ्या काळानंतर पुन्हा एकदा भारतीय संघाने मोठी स्पर्धा जिंकली आहे. यामुळे या संघाला बीसीआय किती बक्षीसी देणार याकडे क्रिकेट विश्वाचे लक्ष लागले आहे. भारतीय संघाला विजेतेपदाचे २०.३६ कोटी रुपये मिळणार आहेत. तसेच बीसीसीआयला जाहिराती, प्रसारण हक्क, स्पॉन्सर आदींमधूनही अब्जावधींचे उत्पन्न झालेले आहे. यामुळे यातून बीसीसीआय किती खजिना रिता करते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.