नवी दिल्ली : भारताचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडने परस्पर हितसंबंध जपल्याचा आक्षेप बीसीसीआयने घेतला होता. त्यानंतर बीसीसीआयचे लोकपाल निवृत्त न्यायाधिश डी.के.जैन यांनी द्रविडला नोटीसही बजावली होती. आता या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. त्यामुळे आता द्रविडला दिलासा मिळाला असून प्रशासकीय समिती सदस्यांनीच थेट त्याची बाजू घेतली आहे. त्यामुळे आता चेंडू बीसीसीआयचे लोकपा जैन यांच्या कोर्टात असल्याचे म्हटले जात आहे.
द्रविड सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या क्रिकेट ऑपरेशन समितीचा प्रमुख म्हणून काम पाहत आहे. पण, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( बीसीसीआय) शिस्तपालन अधिकाऱ्याने हितसंबंध जपण्याचा आरोप लावत 'जंटलमन' द्रविडला नोटीस पाठवली होती. मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे सदस्य संजीव गुप्ता यांच्या तक्रारीनंतर बीसीसीआयचे लोकपाल निवृत्त न्यायाधीश डी.के.जैन यांनी ही नोटीस पाठवली होती.
गुप्ता यांनी केलेल्या तक्रारीनुसार द्रविड हा राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा प्रमुख आहे आणि शिवाय तो इंडिया सिमेंट ग्रुपचा उपाध्यक्ष आहे आणि इंडियन प्रीमिअर लीगमध्ये त्यांचा चेन्नई सुपर किंग्स संघ खेळत आहे. याप्रकरणी द्रविडला नोटीस पाठवण्यात आली होती आणि त्याला उत्तर देण्यासाठी दोन आठवड्यांचा कालावदी देण्यात आला होता.
संजीव गुप्ता यांनीच सचिन तेंडुलकर, व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्या क्रिकेट सल्लागार समितीतील सहभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. तेंडुलकर आणि लक्ष्मण हे दोघेही अनुक्रमे आयपीएलमधील मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघाचे मेंटॉर आहेत.
राहुल द्रविडच्या बाबतीत परस्पर हितसंबंध जपले जात नसल्याचे बीसीसीआयने अखेर मान्य केले आहे. त्यामुळे आता तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये कार्यरत राहू शकतो. बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीचे सदस्य लेफ्टनंट जनरल रवी थोडगे यांनी द्रविडला दिलासा दिला आहे. याबाबत थोडगे म्हणाले की, " राहुल द्रविडच्या प्रकरणात परस्पर हितसंबंध असल्याचे दिसत नाही. द्रविडला नोटीस मिळाली होती. पण याप्रकरणी आम्हाला परस्पर हितसंबंध असल्याचे दिसले नाही, त्यामुळेच आम्ही त्याची नियुक्ती केली होती. पण जर लोकपालला याप्रकरणी परस्पर हितसंबंध असल्याचे वाटत असेल तर आम्ही याबाबत आमचा पक्ष ठेवणार आहोत."