T20 वर्ल्डकप नुकताच झाला. टीम इंडिया सेमी फायनलमधून बाहेर पडली. या वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाची कामगिरी काही खास नव्हती. आता बीसीसीआय याचे विश्लेषण करणार आहे. दरम्यान, काल शुक्रवारी बीसीसीआयने चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील असलेली राष्ट्रीय निवड समिती बरखास्त केली. येत्या काही दिवसांत बीसीसीआय रोहित शर्माबाबत मोठा निर्णय घेऊ शकते, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता रोहित शर्माचे कर्णधारपद राहणार की जाणार या चर्चा सुरू झाल्या आहेत.
बीसीसीआयने नवीन निवड समितीसाठी अर्ज मागवण्यासोबत काही उद्दिष्टे निश्चित केली आहेत. टीम इंडियाच्या नव्या निवड समितीचे पहिले काम वेगवेगळ्या फॉरमॅटसाठी वेगळा कर्णधार बनवणे असेल. जेव्हा जेव्हा नवीन निवड समिती कार्यभार स्वीकारेल तेव्हा तिन्ही फॉरमॅटमध्ये कर्णधार निवडणे बंधनकारक असेल. यामुळे आता रोहित शर्माचे कर्णधारपद जाण्याची शक्यता आहे.
ब्रेकिंग न्यूज : वर्ल्ड कपमधील अपयशानंतर BCCIचा मोठा निर्णय; संपूर्ण निवड समितीची हकालपट्टी
रोहित शर्मा सध्या एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार असेल. तर हार्दिक पांड्या यूएसए आणि वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या २०२४ टी-२० विश्वचषकापर्यंत भारतीय संघाचा लहान फॉरमॅटचा कर्णधार असेल, असं बोलले जात आहे. हार्दिक सध्या न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व करत असून, यामध्ये कर्णधार म्हणून त्याने चांगली कामगिरी केल्यास या निर्णयावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
29 वर्षीय हार्दिक पांड्याने वर्ल्डकपमध्ये चांगली कामगिरी केली. पांड्या गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीत चांगली कामगिरी केली. हार्दिक पांड्याने आयपीएल 2022 मध्ये 15 सामन्यांमध्ये 44.27 च्या सरासरीने 487 धावा केल्या, ज्यामध्ये चार अर्धशतकांचा समावेश आहे. यासोबतच त्याने गोलंदाजीतही कमाल केली आणि एकूण आठ विकेट्स आपल्या नावावर केल्या.
2013 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर भारताने एकही आयसीसी ट्रॉफी जिंकलेली नाही. या वर्षी रोहित शर्मा विजेतेपदाचा दुष्काळ संपवू शकेल, अशी आशा सर्वांनाच होती. इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यातही रोहितच्या कर्णधारपदाचा बेरंग दिसला. संपूर्ण स्पर्धेत त्याची फलंदाजी खराब राहिली आणि त्याने सहा सामन्यांत 19.33 च्या सरासरीने 116 धावा केल्या.