भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं शनिवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करताना चाहत्यांना मोठा धक्का दिला. 15 ऑगस्ट 2020 ही तारीख धोनी चाहत्यांसाठी धक्का देणारी ठरली. मागील वर्षभरापासून धोनीच्या निवृत्तीची चर्चा सुरू होतीच, पण धोनी मैदानाबाहेर निवृत्त होईल, असा विचार कुणी ध्यानी मनी केला नसेल. पण, धोनीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. भारतीय क्रिकेटसाठी धोनीचं योगदान लक्षात घेता भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) निरोपाचा सामना आयोजित करण्याच्या विचारात आहे.
पुरस्कार ते तिरस्कार; क्रिकेटवीरांना 'अपमानाचा नारळ' द्यायचं BCCI चं धोरण बरं नव्हं!
वन डे, ट्वेंटी-20 वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी या आयसीसीच्या तीनही प्रमुख स्पर्धा जिंकणारा जगातला एकमेव कर्णधार आहे धोनी. आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत टीम इंडियानं अव्वल स्थान मिळवले, ते धोनीच्या नेतृत्वाखालीच. 40 वर्षांत ऑस्ट्रेलियाला कसोटीत व्हाईटवॉश कुणी दिला नव्हता, तो धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं विक्रम नोंदवला. याशिवाय त्याच्या नावावर अनेक वर्ल्ड रेकॉर्ड आहेत. अशा या विक्रमादित्य धोनीसाठी निरोपाचा सामना आयोजित करायलाच हवा, अशी मागणी जोर धरत आहे.
चाहत्यांचा भावनांचा आदर राखताना, बीसीसीआय धोनीसाठी निरोपाच्या सामन्याचं आयोजित करण्याच्या विचारात आहे. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्यानं IANS ला सांगितले की,''सध्या आंतरराष्ट्रीय मालिका नाही, परंतु आयपीएलनंतर आम्ही काय करू शकतो, याचा विचार करत आहोत. धोनीचं भारतीय संघासाठीचं योगदान अमुल्य आहे आणि त्याला तो सन्मान मिळायलाच हवा. त्यानं निवृत्तीचा सामना खेळावा, अशी आमचीही इच्छा होती. पण, धोनी वेगळा खेळाडू आहे आणि कोणाच्या ध्यानी मनी नसताना त्यानं निवृत्तीची घोषणा केली.''
निवृत्तीच्या सामन्याबद्दल धोनीशी काही चर्चा झाली आहे का, याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले,''नाही, परंतु आयपीएलदरम्यान आम्ही त्याच्याशी चर्चा करणार आहोत. तेथे त्याचं मत जाणून घेणार आहोत. त्याच्यासाठी निरोपाचा सोहळा आयोजित केला जाईल, आता त्यासाठी तो तयार होईल की नाही, यावर सर्व अवलंबून आहे. त्याचा सन्मान करणे हे आमचे भाग्यच आहे.''
धोनीनं 90 कसोटी सामन्यांत 38.09 च्या सरासरीनं 6 शतकं व 33 अर्धशतकांसह 4876 धावा केल्या आहेत. 350 वन डे क्रिकेटमध्ये त्याची सरासरी ही 50.57 इतकी आहे. त्याच्या 10773 धावांत 10 शतकं व 73 अर्धशतकांचा समावेश आहे. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये त्यानं 98 सामन्यांत 1617 धावा केल्या आहेत. यष्टिरक्षणात कसोटीत त्याच्या नावावर 256 झेल व 38 स्टम्पिंग, वन डेत 321 झेल व 123 स्टम्पिंग आणि ट्वेंटी-20त 57 झेल व 34 स्टम्पिंग आहेत.
Web Title: BCCI willing to host a farewell match for MS Dhoni, Official
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.