नवी दिल्ली : करारबद्ध असो वा निवृत्त कुण्याही भारतीय क्रिकेटपटूला दक्षिण आफ्रिका आणि संयुक्त अरब अमिरात येथे होणाऱ्या दोन टी-२० लीगमध्ये खेळण्यास बीसीसीआय मान्यता प्रदान करणार नाही. आयपीएलमध्ये खेळणाऱ्या कुठल्याही खेळाडूला या विदेशातील लीगमध्ये मेंटॉर बनण्याचीदेखील परवानगी देता येणार नाही. बोर्डाचे हे धक्कातंत्र अनेक खेळाडूंचे आर्थिक गणित बिघडविणारे ठरू शकते.याचा दुसरा अर्थ असा की, महेंद्रसिंग धोनी हा सीएसए लीगमध्ये खेळणाऱ्या त्याच्या फ्रॅन्चायजीच्या दुसऱ्या संघाचा मेंटॉर बनू शकणार नाही. धोनी हा सध्या सीएसकेसाठी आयपीएल खेळत आहे. बोर्डाच्या एका पदाधिकाऱ्याने नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर सांगितले की, स्थानिक खेळाडूसह कुठलाही भारतीय खेळाडू देशाबाहेरील लीगमध्ये तोपर्यंत सहभागी होऊ शकणार नाही जोवर तो क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर करणार नाही. एखाद्या खेळाडूला या लीगमध्ये सहभागी व्हायचे असेल तर त्याने सर्वात आधी बीसीसीआयसोबतचे सर्व संबंध स्थगित करायला हवेत. धोनीसारखा खेळाडू अशा लीगमध्ये कोच किंवा मेंटॉर बनू शकेल काय? या प्रश्नावर हा अधिकारी म्हणाला, ‘मग धोनी सीएसकेसाठी आयपीएल खेळू शकणार नाही. त्याला आधी निवृत्ती घ्यावी लागेल.’आयपीएलमधील सहा संघमालकांनी सीएसए लीगमधील संघांची मालकी खरेदी केली आहे. क्रिकेट दक्षिण आफ्रिकेच्या मते आयपीएलमधील मुंबई, लखनौ, हैदराबाद, चेन्नई, राजस्थान आणि दिल्ली या संघ मालकांनी सीएसए लीगमध्ये केपटाऊन, दरबन, पोर्ट एलिझाबेथ, जोहान्सबर्ग, पार्ल आणि प्रिटोरिया या संघांची मालकी स्वत:कडे घेतली. यूएई टी-२० लीगमध्ये आधीपासूनच सहापैकी पाच संघ भारतीय मालकांचे आहेत. त्यातही मुंबई, दिल्ली आणि कोलकाता या संघ मालकांचे संघ आहेत. केकेआर, पंजाब किंग्स आणि राजस्थान रॉयल्स या संघमालकांनी तर आधीपासून कॅरेबियन लीगमध्येही गुंतवणूक केली आहे.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- बीसीसीआयचे धक्कातंत्र; सीएसए, यूएई लीगमध्ये भारतीयांना खेळण्याची परवानगी नाही
बीसीसीआयचे धक्कातंत्र; सीएसए, यूएई लीगमध्ये भारतीयांना खेळण्याची परवानगी नाही
BCCI : बोर्डाचे हे धक्कातंत्र अनेक खेळाडूंचे आर्थिक गणित बिघडविणारे ठरू शकते.
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2022 6:27 AM