team india for world cup 2023 | नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्ली येथे जी-२० परिषदेचा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवरुन नवीन वाद सुरू झाला आहे. या पत्रिकेवर देशाचा उल्लेख 'इंडिया'ऐवजी भारत केल्याने विरोधकांनी सरकारला लक्ष्य केले. आपल्या देशाचे नाव 'इंडिया'ऐवजी 'भारत' करण्याची चर्चा सुरू झाली आहे. विविध क्षेत्रातील दिग्गज यावर आपापली प्रतिक्रिया देत आहेत. अशातच भारतीय संघाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने सांगितले की, 'इंडिया' हे नाव ब्रिटीशांनी दिले असल्याने विश्वचषकात भारताच्या जर्सीवर केवळ भारत असा उल्लेख करायला हवा.
देशाच्या नावावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली असताना सेहवागने सोशल मीडियावर एक पोस्ट करून सर्वांचे लक्ष वेधले. त्याने सांगितले की, मला नेहमीच वाटते की, आपल्यामध्ये अभिमान जागृत करणारे नाव असावे. आम्ही भारतीय आहोत, इंडिया हे ब्रिटीशांनी दिलेले नाव आहे आणि आमचे मूळ नाव 'भारत' आहे. हे नाव अधिकृतरीत्या परत मिळण्यास बराच काळ लोटला आहे. त्यामुळे मी बीसीसीआय आणि जय शाह यांना आग्रह करतो की, आगामी विश्वचषकात आमच्या खेळाडूंच्या छातीवर अर्थात जर्सीवर 'भारत' असेल याची खात्री करावी. तसेच विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर झाल्यानंतर सेहवागने बीसीसीआयच्या पोस्टवर व्यक्त होताना टीम इंडिया नाहीतर टीम भारत करण्याचा सल्ला दिला.
दरम्यान, बीसीसीआयने एक व्हिडीओ शेअर केला असून '𝗪𝗘 𝗔𝗥𝗘 𝗧𝗘𝗔𝗠 𝗜𝗡𝗗𝗜𝗔' अशा आशयाचं कॅप्शन दिलं आहे. बीसीसीआयच्या या पोस्टवर काही चाहते टीम भारत अशा कमेंट्स करत आहेत. ५ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर झाला. कर्णधार रोहित शर्मा आणि निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी पत्रकार परिषद घेत भारताचा संघ जाहीर केला.
वन डे श्वचषकासाठी भारतीय संघ -रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन, लोकेश राहुल, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव.