राजकोट - क्रिकेट म्हणजे भारतीयांचा जीव की प्राण. त्यामुळे क्रिकेटच्या मैदानात मोठी कामगिरी करता आली नसली तरी क्रिकेटशी संबंधित एकादी तरी वस्तू प्रत्येक क्रिकेटप्रेमींच्या संग्रहात असते. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवणाऱ्या क्रिकेटपटूंचे जीवन आणि घर तर क्रिकेटचे संग्रहालयच बनलेले असले. भारताच्या अशाच एका अष्टपैलू क्रिकेटपटूने आपल्या जीवनातील क्रिकेटचे अनन्यसाधारण स्थान विचारात घेऊन आपल्या नव्याने बांधकाम होत असलेल्या बंगल्याला क्रिकेटच्या थीमवर सजवण्याचे ठरवले आहे. आपल्या स्वप्नातील घराला क्रिकेटच्या थीममध्ये आकार देणाऱ्या भारताच्या या स्टार क्रिकेटपटूचे नाव आहे. रवींद्र जडेजा. श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघातून विश्रांती देण्यात आलेला जडेजा सध्या आपल्या बांधकाम सुरू असलेल्या घराच्या देखरेखीमध्ये गुंतलेला आहे. त्याने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर करून आपल्या स्वप्नातील बंगल्याविषयी भावना व्यक्त केल्या आहे. क्रिकेटचा बंगला आकार घेतोय, होम स्वीट होम, पीस, राजपूत बॉय अशा शब्दात त्याने या बंगल्याबाबत आपल्या भावना मांडल्या आहेत. या बंगल्यामध्ये क्रिकेटशी संबंधित सामान वापरून इंटेरियरचे डिझाइन केले जाणार आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत जडेजाचा संघात समावेश नसला तरी त्याचा झंझावाती फॉर्म कायम आहे. रवींद्र जाडेजाने नुकत्याच झालेल्या जामनगर आणि अमरेलीमधील स्थानिक टी-20 सामन्यात तुफान फटकेबाजी करुन उपस्थितांची मने जिंकली होती. सौराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या मैदानावर झालेल्या सामन्यात जाडेजाने चौफेर फटकेबाजी केली. जामनगरकडून खेळणा-या जाडेजाने एका षटकात सहा षटकार ठोकले आणि 69 चेंडूत 154 धावा केल्या होत्या होत्या. रवींद्र जाडेजाच्या फलंदाजीच्या बळावर जामनगरच्या संघाने 20 षटकात 6 विकेट गमावून 239 धावा ठोकल्या. जामनगरने दिलेल्या 240 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अमरेलीच्या संघाने निर्धारीत 20 षटकात पाच विकेट गमावून फक्त 118 धावा केल्या.