Kavya Maran SRH Washington Sundar, IPL 2022: सनरायझर्स हैदराबाद संघाची मालकीण काव्या मारन ही IPLच्या प्रत्येक हंगामात चर्चेत असते. अगदी संघ निवडण्याच्या लिलाव कार्यक्रमापासून ते सामन्यात संघाला चीअर करेपर्यंत तिची हजेरी कायम दिसते. सुरूवातीच्या सामन्यात SRHचा संघ पराभूत होत असल्याने तिने निवडलेल्या खेळाडूंवर प्रश्न उपस्थित केले जात होते. पण नंतर SRH ने सलग पाच विजय मिळवले. जरा कुठे त्यांची गाडी रूळावर येत होती, तर पुढील दोन सामन्यात त्यांना पराभूत व्हावे लागले. त्यातच त्यांच्या संघावरील संकटं कमी होण्याचं नाव घेत नाहीत. आता त्यांच्या संघापुढे एक नवीनच समस्या उभी राहिली आहे. संघाचा प्रमुख खेळाडू वॉशिंग्टन सुंदर याला दुखापत झाल्याचे समोर आले आहे.
वॉशिंग्टन सुंदरच्या हाताला पुन्हा दुखापत झाली आहे. तो ज्या गोलंदाजी करतो, त्याचा हाताला दुखापत झाली आहे. याच कारणामुळे तो चेन्नई सुपर किंग्ज (CSK) विरुद्धच्या सामन्यात गोलंदाजी करू शकला नाही. सनरायझर्स हैदराबादचे (SRH) मुख्य प्रशिक्षक टॉम मूडी यांनी हा खुलासा केला आहे. गोलंदाजी करतो त्याच हाताला झालेल्या दुखापतीमुळे वॉशिंग्टन सुंदर गुजरात टायटन्स विरुद्ध तीन सामने खेळून बाहेर पडला. त्यानंतर त्याने पुनरागमन केले होते. पण रविवारी चेन्नई विरुद्ध क्षेत्ररक्षण करताना त्याच्या हाताला पुन्हा दुखापत झाली. त्यामुळे पुढील सामन्यात (५ मे) दिल्ली कॅपिटल्स (DC) विरुद्ध तो खेळेल की नाही, याबाबत साशंकता आहे.
दरम्यान, चेन्नईकडून सनरायझर्स संघाचा १३ धावांनी पराभव झाला. या सामन्यात सुंदरला गोलंदाजी करता आली नाही. तो फलंदाजीला आला तेव्हा पण त्याला फक्त दोन चेंडूंचा सामना करता आला. टॉम मुडी यांनी सामन्यानंतर सांगितले की, “यापूर्वी ज्या हाताला दुखापत झाली होती, त्याच हाताला दुखापत होणे दुर्दैवी आहे. यापूर्वी झालेली जखम पूर्णपणे बरी झाली होती, मात्र तोच भाग पुन्हा दुखावला आहे. सध्यातरी टाके घालण्याची गरज नाही. पण दुर्दैवाने तो गोलंदाजी करण्याच्या स्थितीत नव्हता. त्याचा आमच्या गोलंदाजीवर खरोखरच परिणाम झाला, कारण तो आमच्यासाठी महत्त्वाचा गोलंदाज आहे.”