अबुधाबी : ‘टी-१० क्रिकेटच्या आगमनानंतर फलंदाज अपारंपरिक फटके खेळू लागल्याने गोलंदाजांपुढील आव्हाने अधिक वाढली आहेत. यासाठी गोलंदाजांना अधिक साहस दाखवून आणि आत्मविश्वासाने गोलंदाजी करावी लागेल,’ असे मत इंग्लंडचा अनुभवी लेगस्पिनर आदिल राशिद याने व्यक्त केले. राशिद अबुधाबी टी-१० लीगमध्ये दिल्ली बुल्स संघाचे प्रतिनिधित्व करत आहे.
राशिद म्हणाला की, ‘वाढत्या वयात क्रिकेटच्या या अत्यंत लहान आणि वेगवान प्रकारात खेळणे आव्हानात्मक ठरते. कारण तुम्ही सपाट खेळपट्टी आणि लहान मैदानात खेळता. फलंदाजांची रुंदी वाढल्याने गोलंदाजांविरुद्ध मोठे फटके मारणे सोपे झाले आहे. जर तुमच्याविरुद्ध सलग दोन सामन्यांत षटकार-चौकार बसत असतील, तर त्याचा मनावर वाईट परिणाम होतो.’
राशिद पुढे म्हणाला की, ‘एक फिरकीपटू म्हणून तुम्हाला अधिक आत्मविश्वासाने मारा करावा लागतो. तुम्ही मॅचविनर असल्याचा विश्वास असतो. या जोरावर तुम्ही तीन, चार किंवा पाच चेंडूंमध्ये बळी घेऊन सामना फिरवू शकता. यासाठी तुम्हाला नेट्समध्ये वैविध्यपूर्ण माऱ्याचा सराव करण्याची गरज आहे. मानसिकरीत्या मजबूत राहणे अत्यंत आवश्यक आहे.’