Pakistan Cricket Team : भारताविरूद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानी संघ ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे. शुक्रवारी होणाऱ्या या सामन्यापूर्वी बाबर आझमच्या संघाच्या अडचणीत वाढ झाल्याचे दिसते. पाकिस्तानी संघातील काही खेळाडू ताप आणि दुखापतीने त्रस्त आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, संघाचा सलामीवीर फखर झमान त्याच्या गुडघ्याच्या दुखापतीवर उपचार घेत असून तो पुढील आठवड्यापर्यंत निवडीसाठी उपलब्ध असेल. याशिवाय मधल्या फळीतील फलंदाज अघा सलमानला ताप आला असून तो विश्रांती घेत आहे. दोन खेळाडू तंदुरुस्त नसणे पुढील सामन्यात पाकिस्तानसाठी अडचणीचे ठरू शकते.
तसेच फखर आणि सलमान व्यतिरिक्त १५ सदस्यीय संघातील इतर सर्व खेळाडू पूर्णपणे ठीक असल्याची माहिती बोर्डाने दिली आहे. खरं तर फखर झमान आणि अघा सलमान हे दोघेही भारताविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात पाकिस्तानच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग नव्हते. सलामीवीर फखरच्या जागी अब्दुल्ला शफीक दिसला होता, तर अघा सलमानला अद्याप विश्वचषकातील एकाही सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळालेले नाही.
पाकिस्तानी संघाने आतापर्यंत विश्वचषकात खेळल्या गेलेल्या ३ पैकी २ सामने जिंकले आहेत. स्पर्धेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानने नेदरलँड्सचा ८१ धावांनी तर दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेचा ६ गडी राखून पराभव केला. मात्र, त्यानंतर तिसऱ्या सामन्यात बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानी संघाला भारताकडून दारूण पराभवाचा सामना करावा लागला. विश्वचषकासाठी पाकिस्तानी संघ - बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उप कर्णधार), फखर जमान, इमाम-उल-हक, अब्दुल्ला शफीक, मोहम्मद रिझवान, सलमान आगा, सौद शकील, इफ्तिखार अहमद, मोहम्मद नवाज, सॅम मीर, हारिस रौफ, मोहम्मद वसीम ज्युनिअर, हसन अली आणि शाहीन आफ्रिदी.
राखीव खेळाडू - मोहम्मद हारिस, जमान खान, अबरार अहमद.