Rohit Sharma Press Conference : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात बुधवारी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर उपांत्य फेरीचा सामना होत आहे. भारतीय संघाचा विजयरथ कायम आहे तर न्यूझीलंडने देखील चांगला खेळ करत इथपर्यंत मजल मारली. भारताने साखळी फेरीतील सर्व सामने जिंकले तर किवी संघाने पाच विजयांसह चौथे स्थान गाठले. न्यूझीलंडविरूद्धच्या महत्त्वाच्या लढतीपूर्वी भारतीय कर्णधार रोहित शर्माने मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन विविध मुद्द्यांवर भाष्य केले.
हिटमॅन रोहितला त्याच्या आतापर्यंतच्या सर्वात खास क्षणाबद्दल विचारले असता त्याने हसत उत्तर दिले. रोहित म्हणाला की, कदाचित आतापर्यंतचा सर्वात खास क्षण हाच आहे. कारण आमच्या संघातील ४ जणांनी शेवटच्या सामन्यात गोलंदाजी करायला सुरुवात केली. मला आशा आहे की प्रत्येकाने त्या क्षणाचा आनंद घेतला असेल. तसेच विद्यमान भारतीय संघाचे सौंदर्य हे आहे की, जेव्हा भारताने १९८३ चा विश्वचषक जिंकला तेव्हा आमचा जन्मही झाला नव्हता. २०११ मध्ये आम्ही जिंकलो तेव्हा विद्यमान संघातील निम्मे खेळाडू खेळत नव्हते. आम्ही शेवटचा विश्वचषक कसा जिंकला याबद्दल बोलताना मी त्यांना पाहिले देखील नाही. आपण कसे चांगले होऊ शकतो आणि आपण खेळात कशी सुधारणा करू शकतो यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. सध्याच्या पिढीतील खेळाडूंचे हेच सौंदर्य आहे, असेही रोहितने सांगितले.
संघाच्या यशाबद्दल बोलताना रोहित म्हणाला, "माझ्याकडे कोणताही मंत्र नाही. एक कर्णधार म्हणून खेळाडूंना शक्य तेवढा पाठिंबा देण्याचा मी प्रयत्न करतो. माझे आता सर्व लक्ष खेळावर आहे. माझ्या क्रिकेटच्या प्रवासावर नाही. कदाचित मी १९ तारखेनंतर (विश्वचषक फायनल) माझ्या इथपर्यंतच्या प्रवासाचा विचार करेन पण सध्या लक्ष फक्त खेळावर आहे."
"वानखेडे स्टेडियमवर टॉस फॅक्टर ठरत नाही"
दरम्यान, रोहित शर्मा त्याच्या घरच्या मैदानावर उपांत्य फेरीचा सामना खेळत आहे. त्यामुळे वानखेडे स्टेडियम आणि रोहित शर्मा हे नाते जुने आहे. याबद्दल प्रश्न विचारला असता रोहितने सांगितले की, मी आणि संघातील इतर सहकाऱ्यांनी देखील इथे खूप क्रिकेट खेळले आहे. वानखेडे स्टेडियमवर टॉस फॅक्टर ठरत नाही.
भारताची ऐतिहासिक कामगिरी
भारतीय संघाने विश्वचषकाच्या इतिहासात प्रथमच साखळी फेरीतील सर्व सामने जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. आपल्या अखेरच्या सामन्यात नेदरलँड्सविरूद्ध प्रथम फलंदाजी करताना भारताने ४ गडी गमावून ४१० धावांची विशाल धावसंख्या उभारली. श्रेयस अय्यर आणि लोकेश राहुल यांनी शतकी खेळी करून भारताच्या नवव्या विजयात मोलाची भूमिका बजावली. अय्यरने नाबाद १२८ धावा केल्या तर राहुलने १०२ धावांचे योगदान दिले. ४११ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना नेदरलँड्सचा संघ २५० धावांत आटोपला. स्कॉट एडवर्ड्सच्या नेतृत्वातील नेदरलँड्सला यंदाच्या विश्वचषकात ९ सामन्यांमध्ये २ विजय मिळवता आले. पण, नेदरलँड्सने बलाढ्य दक्षिण आफ्रिकेला पराभवाची धूळ चारून क्रिकेट विश्वाला धक्का दिला. त्यांनी आफ्रिकेला ३८ तर बांगलादेशला ८७ धावांनी पराभूत केले.
Web Title: Before the IND vs NZ semi-final match in icc odi world cup 2023, Indian captain Rohit Sharma held a press conference and commented on various topics
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.