कराची - या आठवड्याच्या अखेरीस होणाऱ्या आयपीएलच्या लिलावाकडे सर्व क्रिकेट विश्वाचे लक्ष लागले आहे. तसेच विविध लीगमध्ये खेळत असलेले खेळाडू लिलावात लक्ष वेधून घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. दरम्यान, आयपीएलच्या लिलावाच्या यादीत नाव असलेला इंग्लंडचा धडाकेबाज फलंदाज जेसन रॉय सध्या पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळत आहे. दरम्यान, सोमवारी झालेल्या एका सामन्यात धडाकेबाज कामगिरी करताना जेसन रॉयने शानदार शतकी खेळी केली. या खेळीच्या जोरावर त्याच्या संघाने २०० हून अधिक धावांच्या आव्हानाचा आरामात पाठलाग केला. जेसन रॉयचे टी-२०मधील हे पाचवे शतक ठरले.
पीएसएलमध्ये झालेल्या या सामन्यात लाहोर कलंदर्सने प्रथम फलंदाजी करताना ५ विकेट्स गमावून २०४ धावा कुटत प्रतिस्पर्धी क्वेटा ग्लेटिएटर्स संघासमोर मोठे आव्हान ठेवले. त्यानंतर जेसन रॉयच्या धडाकेबाज शतकाच्या जोरावर क्वेटा ग्लेडिएटर्सने हे आव्हान ३ विकेट्स गमावून शेवटचे तीन चेंडू राखून प्राप्त केले.
मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना क्वेटा ग्लेटिएटर्सने दमदार सुरुवात केली. जेसन रॉय आणि एहसान अली यांनी पहिल्या विकेट्ससाठी ५.२ षटकात ७१ धावा कुटल्या. यामध्ये एहसानचा वाटा केवळ ७ धावांचा होता. जेसन रॉयने ४९ चेंडूत ८ चौकार आणि आठ षटकारांच्या मदतीने शतक पूर्ण केले. अखेरीस ५७ चेंडूत ११६ धावा काढून बाद झाला. त्यात त्याने ११ चौकार आणि ८ षटकार ठोकले. म्हणजेच केवळ १९ चेंडूत त्याने ९२ धावा काढल्या. यादरम्यान, लाहोरचा कर्णधार शाहीन शाह आफ्रिदीचीही जोरदार धुलाई झाली. त्याच्या ४ षटकात ४० धावा काढल्या गेल्या.
जेसन रॉयच्या टी-२० कारकिर्दीचा विचार केल्यास त्याने या सामन्यापूर्वी २६१ डावांमध्ये २८ च्या सरासरीने ६९७२ धावा फटकावल्या होत्या. त्यामध्ये चार शतके आणि ४७ अर्धशतकांचा समावेश होता. तर त्याचा स्ट्राईक रेट १४३ एवढा होता. दरम्यान, या सामन्यातील शतकी खेळीबरोबरच त्याने टी-२०मधील आपल्या ७ हजार धावा पूर्ण केल्या आहेत.
Web Title: Before the IPL auction, Jason Roy hit 11 fours, 8 sixes, 92 off 19 balls, hit a fifth century.
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.