नवी दिल्ली : रवींद्र जडेजा पुन्हा एकदा मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाला आहे. बीसीसीआयने अलीकडेच ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पहिल्या दोन लढतींसाठी भारतीय संघ जाहीर केला. मागील काही दिवस संघाबाहेर असलेल्या जडेजालाही या मालिकेसाठी (IND vs AUS) संघात स्थान मिळाले आहे. मात्र, त्याआधी त्याला त्याचा फिटनेस सिद्ध करायचा आहे. 9 फेब्रुवारीपासून ऑस्ट्रेलियाविरूद्धची कसोटी मालिका सुरू होणार आहे. कसोटी मालिकेपूर्वी फिटनेस मिळवण्यासाठी भारतीय अष्टपैलू जडेजा उद्यापासून रणजी ट्रॉफी 2022-23 खेळण्यास सुरुवात करेल. त्याला सौराष्ट्र संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. चेन्नईतील चेपॉक येथील एमए चिदंबरम स्टेडियमवर तामिळनाडू विरुद्ध सौराष्ट्र असा सामना रंगणार आहे.
स्पोर्टस्टारने दिलेल्या माहितीनुसार, रवींद्र जडेजा या सामन्यात कर्णधार म्हणून खेळणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी सौराष्ट्रचा नियमित कर्णधार जयदेव उनाडकटला विश्रांती देण्यात आली आहे. जडेजासोबत ज्युनिअर जडेजा म्हणजेच धर्मेंद्रसिंग जडेजाही खेळताना दिसणार आहे. डावखुरा फिरकी गोलंदाज धर्मेंद्रसिंगने आतापर्यंत 6 सामन्यात 23 बळी घेतले आहेत. याशिवाय फलंदाजीतही तो यशस्वी ठरला आहे.
चेतेश्वर पुजाराला विश्रांती सौराष्ट्रच्या संघाचा अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारालाही मंगळवारपासून सुरू होणाऱ्या सामन्यातून विश्रांती देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठीही पुजाराची निवड झाली आहे. जडेजाने सप्टेंबर 2022 पासून एकही सामना खेळलेला नाही. दुखापतीमुळे तो ट्वेंटी-20 विश्वचषक देखील खेळू शकला नव्हता. मागील सामन्यात सौराष्ट्रला आंध्र प्रदेशविरुद्ध पराभव पत्करावा लागला होता. तरीही संघाने क्रमवारीत अव्वल स्थान गाठले आहे.
ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पहिल्या 2 कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत, इशान किशन, आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, सूर्यकुमार यादव.
ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा
- 9 ते 13 फेब्रुवारी, पहिला कसोटी सामना, नागपूर
- 17 ते 21 फ्रेब्रुवारी, दुसरा कसोटी सामना, दिल्ली
- 1 ते 5 मार्च, तिसरा कसोटी सामना, धर्मशाला
- 9 ते 13 मार्च, चौथा कसोटी सामना, अहमदाबाद
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"