India vs New Zealand Series : विराट कोहली आणि रवी शास्त्री यांच्या यशस्वी कारकीर्दिनंतर टीम इंडिया आता नव्या पर्वात पाऊल ठेवत आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर विराटनं टीम इंडियाच्या ट्वेंटी-२० संघाचं कर्णधारपद सोडलं आणि रवी शास्त्री यांचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळही संपला. या जोडीला आयसीसी स्पर्धा जिंकण्यात अपयश आलं असलं तरी त्यांच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियानं अनेक ऐतिहासिक मालिका जिंकल्या. आता राहुल द्रविड ( Rahul Dravid) हा मुख्य प्रशिक्षक आणि रोहित शर्मा ( Rohit Sharma) हा कर्णधार असे नवे पर्व सुरू झाले आहे. या दोघांच्या नव्या इंनिगची कसोटी न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्याच मालिकेत लागणार आहे. मंगळवारी राहुल व रोहित यांच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियानं सरावाला सुरूवात केली.
१७ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या तीन ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी टीम इंडियानं सरावाला सुरुवात केली. न्यूझीलंडचे खेळाडू सोमवारी भारतात दाखल झाले. ट्वेंटी-२० मालिकेसाठी निवडलेल्या संघात दोन्ही राष्ट्रांनी प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिली आहे. भारताकडून विराट कोहली, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी व रवींद्र जडेजा हे ट्वेंटी-२० मालिकेत खेळणार नाहीत, तर न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन यानं कसोटी मालिकेपूर्वी विश्रांती मिळावी म्हणून मर्यादित षटकांच्या मालिकेतून माघार घेतली आहे. पण, न्यूझीलंडचा संघ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील फॉर्म कायम राखून टीम इंडियाला कडवे आव्हान देण्यासाठी सज्ज आहे.
राहुल द्रविड व रोहित शर्मा या आव्हानासाठी सज्ज आहेत. त्यासाठी भारतीय खेळाडूंनी कसून सराव केला. यावेळी रोहितनं नेट्समध्ये फटकेबाजी केली, तर द्रविड नुसतं उपदेश न देता स्वतः थ्रो बॉल स्पेशालिस्ट बनला. त्यानं रोहितला गोलंदाजी केली.
पाहा व्हिडीओ..
भारतीय संघ- रोहित शर्मा ( कर्णधार), लोकेश राहुल ( उप कर्णधार), ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, इशान किशन, वेंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, आर अश्विन, अक्षर पटेल, आवेश खान, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज
न्यूझीलंडचा ट्वेंटी-२० संघ - मार्टीन गुप्तील, डॅरील मिचेल, ग्लेन फिलिप्स, टीम सेईफर्ट, मार्क चॅपमॅन, जिमी निशॅम, मिचेल सँटनर, कायले जेमिन्सन, इश सोढी, टॉड अॅस्टल, अॅडम मिल्ने, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट, टीम साऊदी
India vs New Zealand Schedule 2021
पहिला ट्वेंटी-२०- १८ नोव्हेंबर, २०२१, जयपूर दूसरा ट्वेंटी-२० - १९ नोव्हेंबर, २०२१, रांचीतिसरा ट्वेंटी-२० - २१ नोव्हेंबर, २०२१, कोलकाता